वर्षा गायकवाड यांच्या अडचणी वाढणार? भाजपच्या ‘त्या’ तक्रारीची निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल

मुंबई – महाविकास आघाडीच्या मुंबई उत्तर-मध्यमधील उमेदवार आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात वर्षा गायकवाड यांनी खोटा प्रचार केला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
भाजपचे पदाधिकारी शरद कांबळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. निवडणूक प्रचारात उज्वल निकम दलित विरुद्ध असल्याचा प्रचार केल्याचा आरोप भाजप पदाधिकारी शरद कांबळे यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर केला आहे. त्यांच्या तक्रारीची निवडणूक आयोग आणि पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.
आता पोलिसांनी शरद कांबळे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. मुंबई उत्तर-मध्यमध्ये महायुतीकडून उज्ज्वल निकम वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उभे होते. मात्र लोकसभेचा निकाल ऐन दोन दिवसांवर आलेला असताना आता वर्षा गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.
एक्झिट पोलमध्ये गायकवाड आघाडीवर
महाविकास आघाडीतील जागा वाटपात, मुंबई उत्तर-मध्य हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. यामध्ये काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली.
त्यांच्याविरोधात भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट डावलून उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, या मतदारसंघातून वर्षा गायकवाड निवडून येण्याची शक्यता आहे.





