Bhor : लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा
Bhor : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त कार्यालय, उपसंचालक कार्यालय (पुणे विभाग), वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय (पुणे) तसेच ग्रामपंचायत गुंजवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

भोर : भूजल संवर्धन व जलसंधारणासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी केलेल्या आवाहनास अनुसरून, पुणे जिल्ह्यातील गुंजवणे (ता. राजगड) येथे लोकसहभागातून नवीन वनराई बंधाऱ्याचे बांधकाम व जुन्या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. आयुक्तांनी स्वतः प्रत्यक्ष श्रमदान करून अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांना प्रेरित केल्याने या उपक्रमात एक नवा उत्साह पाहायला मिळाला.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त कार्यालय, उपसंचालक कार्यालय (पुणे विभाग), वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय (पुणे) तसेच ग्रामपंचायत गुंजवणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अतिरिक्त संचालक विजय पाखामोडे, सहसंचालक राहुल ब्राह्मणकर, उपसंचालक माधवी दुबे यांच्यासह तिन्ही कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच गुंजवणे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाबराव रसाळ, उपसरपंच राजाराम रसाळ आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमाची पूर्वतयारी सहाय्यक भूवैज्ञानिक आर. एस. गायकवाड व टी. पी. पखाले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
विशेष म्हणजे, प्रातिनिधिक स्वरूपात वनराई बंधारे बांधण्याचा हा उपक्रम आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका गावात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारा राबविण्यात आला. उपक्रमाच्या समारोपप्रसंगी वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी सर्वांचे आभार मानले.
भूजल पुनर्भरणाला मिळणार वेग
भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने या उपक्रमास विशेष महत्त्व आहे. या वनराई बंधाऱ्यांच्या संभाव्य प्रभावक्षेत्रात गावाच्या पाणीपुरवठ्याची मुख्य विहीर स्थित आहे. त्यामुळे या जलसंधारण कामांमुळे स्थानिक पातळीवर पाणी अडविण्यास मदत होऊन भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रसंगी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना जलसंधारणाचे महत्त्व विशद केले. स्थानिक पातळीवरील अशा छोट्या परंतु परिणामकारक उपाययोजनांमधून भूजल संवर्धनास मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





