Alephata : परराज्यांतील कांद्याने स्थानिक दर पडले
Alephata : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात प्रतिदहा किलोला कमाल 471 रुपये बाजारभाव मिळाला.

आळेफाटा : साठवणुकीतील कांद्याची आवक घटत असतानाच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या परराज्यांमधील नवीन कांद्याची देशांतर्गत बाजारपेठेत आवक सुरू झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावावर दबाव निर्माण झाला असून, आळेफाटा उपबाजारात गेल्या दीड महिन्यापासून दरवाढीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. साठवणुकीतील कांदा संपत आल्याने स्थानिक शेतकर्यांना दरवाढीची अपेक्षा असताना परराज्यांतील नव्या कांद्याच्या आवकेमुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) झालेल्या कांदा लिलावात प्रतिदहा किलोला कमाल 471 रुपये बाजारभाव मिळाला. सप्टेंबर महिन्याच्या तिसर्या आठवड्यापासून कांद्याचे दर प्रतिदहा किलो 500 रुपयांच्या खालीच आहेत. त्यानंतर किरकोळ चढ-उतार वगळता बाजारभावात फारशी सुधारणा झालेली नाही. बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि उपसभापती निवृत्ती काळे यांनी ही माहिती दिली.
सध्या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील नवीन उत्पादित कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. परराज्यांतील कांद्याची आवक वाढल्याने बाजारातील पुरवठा वाढत असून, त्याचा परिणाम दरांवर होत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत साठवणुकीतील कांद्याची आवक कमी असतानाही अपेक्षित दरवाढ होत नसल्याचे चित्र आहे.
रविवारी झालेल्या लिलावात आळेफाटा उपबाजारात एकूण 8 हजार 96 गोणी कांद्याची आवक झाली होती. बाजार समितीचे संचालक प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे आणि कार्यालयप्रमुख सतीश मस्करे यांनी ही माहिती दिली.
नवीन लाल कांद्याची आवक होणार
आळेफाटा उपबाजारात गेल्या दीड महिन्यापासून साठवणुकीतील कांद्याची आवक सातत्याने घटत आहे. कांदा साठवणुकीचा साठा संपत आल्याने शेतकर्यांकडील उपलब्ध कांद्याचे प्रमाणही कमी झाले आहे. अशा परिस्थितीत परराज्यांतील नव्या कांद्याची आवक वाढल्याने स्थानिक कांद्याला अपेक्षित दर मिळण्यात अडथळा निर्माण होत आहे. उत्पादन खर्च, साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता मिळणारा बाजारभाव शेतकर्यांसाठी कितपत परवडणारा आहे, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत आळेफाटा उपबाजारात नवीन लाल कांद्याची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या कांद्याच्या आवकेचा बाजारभावावर काय परिणाम होणार आणि शेतकर्यांना अपेक्षित दर मिळणार का, याकडे कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
दहा किलोचे कांदा बाजारभाव
कांद्याचा प्रकार…दर (रुपये)
गोळा कांदा…451 ते 471
सुपर कांदा…420 ते 450
गोल्टी व गोल्टा…350 ते 400
बदला / चिंगळी…170 ते 281





