मुंबई : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. या मतदानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला मात्र राज्यात काही ठिकाणी या मतदानाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, मतदान केंद्रांची तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. चला तर मग राज्यात कोणत्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत? जाणून घेऊया… 1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील मिळून चार मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली तसेच केंद्र प्रमुखालाही बेदम मारहाणदेखील करण्यात आली. 2) बीड जिल्ह्यातीलच आष्टी मतदार संघातील बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सुरेश धस आणि मेहबुब शेख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही मारहाण झाली. भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र इथं दोनच पोलीस तैनात असल्यामुळं कार्यकर्त्यांचा गोंधळ थांबवण्यात त्यांना अपयश आले. 3) ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा झाला. स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केली. कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर लागलेल्या बूथवर येऊन मारहाण करण्यात आली. 4) मालाड पूर्व पठाणवाडीत शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये भांडण झालं. शिवसेनेचे उमेदवार संजय निरुपम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. 5) वर्ध्यामध्ये निलेश कराळे मास्तरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. ही मारहाण भाजपच्या कार्यकर्त्याने केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. 6) मिरा भाईंदरमध्ये मेहता आणि जैन यांचे कार्यकर्ते भिडले. भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले. भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौकाजवळ ही घटना घडली. स्वतः घटनास्थळी नरेंद्र मेहता पोहचले आणि त्यांनी वातवरण शांत करण्याचा प्रयत्न केला. सध्या वातावरण शांत असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 7) नाशिकच्या नांदगाव इथं अपक्ष समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्यात बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. तुझा आज मर्डर होणार अशी धमकी कांदे यांनी भुजबळ यांना दिली. 8) इंदापूरमध्ये अजित पवार-शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दत्ता भरणे यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. 9) यवतमाळमध्ये एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. 10) कोल्हापुरातील कसबा बावडा इथं शिंदेंच्या उमेदवाराला गद्दर म्हटल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.