Vanchit Protest : अमित शहांच्या विरोधात वंचितने राज्यभर पुकारले आंदोलन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानाच्या निषेधार्थ राज्यात अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे. मुंबई येथील महानगर पालिकेच्या इमारतीच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार आंदोलन केले. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते.
या आंदोलनावेळी आंबेडकरांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, अमित शहाला वाचवायला नरेंद्र मोदी धावून आले. आपल्याला माहीत असेल की, या मुंबईत एक रंगा बिल्ला नावाची जोडी होती आणि आताचे हे रंगा बिल्ला एकमेकांना वाचवत आहेत. मला पंतप्रधान मोदींना सांगायचे आहे की, बाबासाहेब आंबेडकरांना असे संबोधल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही पण तुमचे चारित्र्य समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजप सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी तुम्हाला विचारतो की, या मध्य मुंबई मधील 1952 च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही? हे सांगा. या दोघांनी मिळून मध्य मुंबईमध्ये बाबासाहेबांना निवडणूकीत हरवले आहे. हा इतिहास आहे, असेही ते म्हणाले.





