बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर आज मकोका गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर कराड कुटुंबीय आणि समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी कराड समर्थक आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची तब्येत खालावली असल्याचे समोर आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाल्मिक कराडवर 302 चा खुनाचा गुन्हा आणि मकोका लावण्यात आला आहे. तर कोठडीतून कराडची आता तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. पण त्याआधीच वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार, रुग्णालयात दाखल करायचं की नाही यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कराडच्या काही तपासण्या करण्यात आल्या आहेत, छातीची ईसीजी काढण्यात आली आहे. त्यामध्ये काही बदल आढळून आले आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या आणखी तपासण्या सुरु आहेत. मकोका लागल्याने वाल्मिक कराडचे काय होणार? वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यामुळे पोलिसांना तपासासाठी 180 दिवस मिळणार आहेत. पोलीस 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकतात, तसंच मकोका लावल्यामुळे आरोपीला लवकर जामीनही मिळत नाही. याशिवाय आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता.