Walmik Karad : वाल्मिक कराडची कारागृहात प्रकृती बिघडली; अचानक वाटू लागलं अस्वस्थ, नेमकं काय झालं?

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीने त्याच्या विरोधात सबळ पुरावे दाखल केले आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून कारगृहात आहे. आपला याप्रकरणात काहीच संबंध नसल्याचा कांगावा करत त्याने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड याला बोलण्यास व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने दुपारी बीड जिल्हा कारागृहात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सिटीस्कॅन करण्याचे सल्ला दिला होता. वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने डॉक्टरांना बोलावले.
त्यांनी कराडची तपासणी केली असता त्याला पॅनिक अटॅक आल्याचे समोर आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे.
यापूर्वी देखील प्रकृतीच्या कुरबुरीवरून त्याला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले होते. पण त्या ठिकाणी त्याची मोठी बडदास्त ठेवल्याचे दिसून आले होते. तर तुरुंगातही त्याच्या दिमतीला प्रशासनातील कर्मचारी आणि इतर लोकांना ठेवण्यात आल्याचे समोर आले होते.
दरम्यान बीड येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये मार्च महिन्यात कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाला. यानंतर काही कैद्यांना मारहाण झाली होती. त्यामध्ये संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना महादेव गीते, अक्षय आठवले यांनी मारहाण केली होती.





