Valmik Karad : ‘वाल्मिक कराडला बीड कारागृहातून नागपूरला हलवा’; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
Valmik Karad : वाल्मिक कराड याला बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 'व्ही.आय.पी.' सुविधा पुरवली जात असल्याचा अत्यंत गंभीर आरोप झाला आहे.

Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचा तुरुंगातही पाहुणचार सुरू असल्याची तक्रार सातत्याने होत असते. (Valmik Karad)
बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील पोलिसांकडून आरोपींचा पाहूणचार केला जातो, त्यांना आवश्यक ती सुविधा पुरवली जात असल्याचा आरोपही देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. आता, यावरुन राष्ट्रवादी(शप)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन आरोपी वाल्मिक कराडची नागपूर कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (Valmik Karad)
धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्रात, कराडला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे, अशी माहिती देत सुळे यांनी बीडमधील आरोपी वाल्मिक कराड यास बीडमधून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवावे, अशी मागणी केली. (Valmik Karad)
धनंजय देशमुख यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, यामध्ये इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधणे, दुपारच्या बंदीच्या काळात अधीक्षक कार्यालयात बसवून नियमबाह्य पद्धतीने व्हिडिओ कॉल सुविधा पुरविणे, बराक क्र. 9 जवळील फोनजवळ सीसीटीव्ही कॅमेरा नसणे आणि कारागृहातूनच बीडमधील परिस्थितीवर प्रभाव टाकून इतर आरोपींच्या मदतीने दहशत निर्माण करणे, असे मुद्दे नमूद केले आहेत, अशी माहितीही सुळे यांनी दिली आहे. (Valmik Karad)
बीड कारागृहात घडत असलेला हा प्रकार न्यायप्रक्रियेचा थेट अपमान असून माझी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की, कृपया सदर आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी. बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी. आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे, असेही सुळे यांनी म्हटले आहे. (Valmik Karad)






