Vaishnavi Hagawane : “हगवणे बंधूंनी आई व बहिणीचा मोबाइल केला लंपास…”; पोलिसांची न्यायालयात माहिती

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासू लता आणि नणंद करिष्मा यांचे मोबाइल या गुन्ह्यातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने पती व दिराने लंपास केले आहेत. या मोबाइलमध्ये पती शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. २८) संपली.
त्यामुळे पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. नीलेशचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे, तर लता करिष्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाइलचा देखील शोध सुरू आहे. चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजस हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांक याने त्यांना तीन आणि पाच दिवस आधी वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केली आहे.
त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली, याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसांची, तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. फिर्यादींच्या वतीने ऍड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.
सोन्याबाबची माहिती स्वतः पोलिसांना दिली : बचाव पक्ष
पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी करताना जुनीच कारणे दिली आहेत. सोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वीच आरोपींनी स्वतःहून पोलिसांना दिली आहे. व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. आपले सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवी यांनी केलेली नाही. त्यांचे एका तरुणासोबतचे चॅटिंग शशांक यांना मिळाले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते, याबाबत तपास पोलिसांनी केलेला नाही, असा युक्तिवाद ॲड. दुशिंग यांनी केला.
न्यायालयाने असा दिला आदेश
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवस, तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत आहे. आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती त्यांनी न्यायालयास दिली.





