वैष्णवी हगवणे प्रकरण: माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, यामध्ये कर्नाटकातील माजी मंत्र्यांचा मुलगा प्रितम वीरकुमार पाटील याचाही समावेश आहे. यापूर्वी वैष्णवीचा पती, सासू, नणंद आणि फरार सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अटक झाली होती. आता राजेंद्र आणि सुशील यांना १७ ते २२ मे दरम्यान पळून जाण्यासाठी आणि लपण्यास मदत करणाऱ्या पाच जणांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांना उद्या (२७ मे) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहन भेगडे, मोहन बंडू फाटक, अमोल जाधव आणि राहुल जाधव आणि प्रितम वीरकुमार पाटील यांचा समावेश आहे. प्रितम हा कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे.
वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. तिच्या अंगावर मारहाणीचे २९ व्रण आढळले, त्यापैकी ५ ते ६ ताजे होते. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले. तिचा सासरकडून सातत्याने छळ झाल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली. या प्रकरणाने पुणे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.





