वैष्णवी हगवणे प्रकरणात शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर; शरीरावर आढळल्या एकूण २९ जखमा

Vaishnavi Hagavane death case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कर्नाटक कनेक्शन समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटक येथील काँग्रेसचे आमदार आणि त्यांचा पुत्र तसेच इतर चार जणांना अटक केली आहे. आता वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीचा शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर एकूण २९ जखमा आढळून आल्या आहेत. त्यापैकी १५ जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आतील आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. तसेच आत्महत्या केल्याच्या दिवशी वैष्णवीला सासरकडील लोकांकडून मारहाण झाल्याची माहिती देखील शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. या अहवालाबाबतची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. त्यानुसार न्यायालयाने पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीत २८ मे पर्यंतची वाढ केली आहे.
कर्नाटक कनेक्शन
या प्रकरणात वैष्णवीचे फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी कर्नाटकामधील काँग्रेसचे आमदार वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम वीरकुमार पाटील वय वय ४७, रा. कोगनोली, ता. चिकोडी, बेळगाव यांना अटक केली आहे. तसेच यांच्यासह मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे ( वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५) आणि राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, खटाव, सातारा) यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी मुळशी तालुक्यातील भुक्कम येथील सासरच्या घरी आत्महत्या केली होती. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंब अटकेत आहेत. या प्रकरणी पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे, यांना १७ मे रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने २८ मेपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.





