satara | “स्वतंत्रते भगवती ” कार्यक्रमाने वाईकर मंत्रमुग्ध

वाई, (प्रतिनिधी) – येथील स्वातंत्रवीर सावरकर प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेची सुरुवात “स्वतंत्रते भगवती ” या सावरकर रचित कविता-गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाने झाली. सांगलीच्या गायक, वादकवृंदाने सावरकरांची ज्ञात-अज्ञात गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. सत्यवती सभागृह तुडुंब भरले होते.
गरवारे फायबर्सचे व्हाईस प्रेसिडेंट वैभव जोशी यांच्या हस्ते श्री नटराज पुजन व स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांचा स्वा सावरकर लिखित १९५८ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
या नंतर तब्बल २.३० तास ” स्वतंत्रते भगवती ” हा गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. संगीतमय संकल्पनेची निर्मिती दीपक पाटणकर (सांगली) यांनी केलेली आहे. ही संकल्पना खरोखरच खूप अप्रतिम, अभिनव आणि श्रोत्यांच्या थेट अंतःकरणाला भिडणारी आहे. सांगलीच्या गायक नि वादक वृंदाने सावरकरांची ज्ञात-अज्ञात गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. दीपक पाटणकर यांचे निवेदन आणि सूत्रसंचालन अफलातून होते.
स्वतंत्रते भगवती या कार्यक्रमातून सावरकरांचे संपूर्ण जीवन उलगडून दाखविण्याचा, सावरकरांनी व्यक्त केलेल्या विविध विषयांवरील भावनांना सगळ्यांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न सांगली येथून आलेल्या कलाकारांनी केला. या कार्यक्रमाचे निवेदन पाटणकर यांनी केले. पाटणकर यांनी आपल्या सुश्राव्य आवाजाने सावरकरांचे संपूर्ण जीवन संक्षिप्त स्वरूपात उलगडून दाखवले. कार्यक्रमाला रसिकांनी शेवटपर्यंत उपस्थिती दाखवली.
व्याख्यानमालेच्या पहिल्याच दिवशी प्रत्यक्ष संगीतमय सावरकर आख्यान श्रवण करण्याची संधी वाईकर श्रोत्यांना प्राप्त झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे सतीश शेंडे, यशवंतराव लेले, सुनील देशपांडे, मनीषा घैसास, आदित्य चौंडे, आनंद पटवर्धन, मंदार सोनपाटकी, सौ. प्रिती फडके, विवेक शिंदे, शिरीष घैसास व अनेक सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. दरवर्षी श्री महागणपती घाटावरब होणारी व्याख्यानमाला पावसाची शक्यता असल्यामुळे पुढील तीनही दिवस सत्यवती सभागृहात संध्याकाळी ७ ते ८.३० या वेळेत होणार आहे.





