Satara| विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटचे ज्ञान मिळवणे गरजेचे

वाई, (प्रतिनिधी)- आजच्या काळात विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटचे ज्ञान प्राप्त करणे गरजेचे असून त्यातून विद्यार्थ्यांना अर्थार्जनाच्या संधी प्राप्त होतील. अलीकडे लोक बँकेपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत.
शेअरची खरेदी विक्री करताना होणाऱ्या फसवणुकीपासून खरेदीदारांनी सावध राहणे आवश्यक आहे, असे आवाहन सेबीचे प्रशिक्षक अमोल मारेकर यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचा वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वित्तीय साक्षरता या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा झाली.
कार्यशाळेस श्री. अमोल मारेकर यांनी ‘भांडवली बाजारातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर होते.
कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य भीमराव पटकुरे व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मारेकर म्हणाले, गुंतवणूकदारांना वित्तीय साक्षरतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आगामी काळामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून विद्यार्थ्यांना खूप संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी आवश्यक वित्तीय ज्ञान व कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करून योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थैर्य प्राप्त करता येते. गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराकडे दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहणे आवश्यक आहे.
डॉ. वीर यांनी जगातील सर्वात मोठी संधी म्हणून शेअर मार्केटकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वित्तीय साक्षरता अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील संधींचा शोध घेऊन कौशल्याने संधी मिळवावी.
भीमराव पटकुरे व प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. संयोजक संदीप पातुगडे यांनी कार्यशाळेचे महत्त्व प्रास्ताविकात सांगितले. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
श्रीमती श्रुती यादव यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र जमदाडे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जयवंत पवार, श्रीमती प्रज्ञा पवार व श्रीमती रेखा भोसले तसेच वाणिज्य मंडळातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




