Satara | एनएसएसमध्ये नेतृत्व विकसित होते – प्रा. डॉ. सुनील सावंत

वाई, (प्रतिनिधी)- एनएसएसच्या स्वयंसेवकांनी स्वतःबरोबरच समाजाचाही विचार करावा. कूपमंडूक वृत्ती सोडून सर्वांगीण विचार करावा. स्वतःबरोबरच राष्ट्राचा विकास साधताना सजग राहवे. कारण एनएसएसमुळे नेतृत्व विकसित होते, असे मत इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘नॉट मी बट’ यू या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कला विभागाचे उपप्राचार्य व एनएसएसचे सल्लागार प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट यांची उपस्थिती होती. डॉ. सावंत म्हणाले, समाजसेवेतून एनएसएसचा स्वयंसेवक महात्मा गांधी यांच्या सर्वोदय या विचाराशी जोडला जाऊ शकतो.
परंतु, त्यासाठी स्वयंसेवकांनी स्वचा त्याग करून व संकुचित वृत्तीतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ बनवावे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम ते शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार एनएसएसच्या उद्देशांशी मिळतेजुळते आहेत.
या विचारांचे ग्रहण केल्यास स्वयंसेवक घडेल. आपल्या व्याख्यानातून त्यांनी एनएसएसच्या स्थापनेचा इतिहास सांगितला.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन जीवन हे सुवर्णक्षण असतात. एनएसएसच्या माध्यमातून समाजाच्या ॠणातून मुक्त होण्याची संधी मिळते. या विभागाचा स्वयंसेवक कॉलेजला समाजाशी जोडतो.
डॉ. चंद्रकांत कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अंबादास सकट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
श्रीमती सुमती कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप वाटेगावकर, कनिष्ठ लिपिक जितेंद्र चव्हाण, स्वीटी नरवाडे, नम्रता शेलार, धनश्री जाधव, राणी काळे, राणी सणस, अश्विनी गोळे यांनी परिश्रम घेतले.





