Vaibhav Suryavanshi : IPL 2026 पूर्वीच वैभव सूर्यवंशीचा जलवा! रवींद्र जडेजाची धुलाई करत प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा, पाहा VIDEO
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी दिग्गज फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे.

Vaibhav Suryavanshi vs Ravindra Jadeja Nets Video : राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी दिग्गज फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. जडेजाने टाकलेल्या ६ चेंडूंपैकी ५ चेंडूंना वैभवने सहजपणे हवेत उडवून सीमापार धाडले. जडेजासारख्या जागतिक दर्जाच्या फिरकीपटूसमोर इतक्या लहान वयात दाखवलेला हा निर्भीडपणा पाहून क्रिकेट तज्ज्ञ अवाक् झाले आहेत, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
१८ वर्षांनंतर जडेजाची ‘घरवापसी’ –
यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बातमी म्हणजे रवींद्र जडेजाची राजस्थान रॉयल्समध्ये झालेले पुनरागमन. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली जडेजा याच संघाकडून खेळला होता. आता तब्बल १८ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा ‘रॉयल्स’ची जर्सी परिधान करणार आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबत झालेल्या ऐतिहासिक ट्रेडमध्ये संजू सॅमसनच्या बदल्यात जडेजा आणि सॅम करन राजस्थानच्या ताफ्यात सामील झाले आहेत.
वैभव सूर्यवंशीचा धडाका –
🗡️🆚🥶 pic.twitter.com/02GTC3hCcr
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 19, 2026
गेल्या हंगामात पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने ७ सामन्यांत २०६.५५ च्या तुफानी स्ट्राईक रेटने २५२ धावा कुटल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएल २०२६ मध्येही त्याच्याकडून अशाच स्फोटक कामगिरीची अपेक्षा संघ व्यवस्थापनाला आहे.
३० मार्चला रंगणार ‘महामुकाबला’ –
राजस्थान रॉयल्स आपल्या मोहिमेची सुरुवात ३० मार्च रोजी गुवाहाटीत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध करेल. हा सामना संजू सॅमसन विरुद्ध रवींद्र जडेजा असा असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. त्यानंतर ४ एप्रिलला गुजरात टायटन्स आणि ७ एप्रिलला मुंबई इंडियन्सशी राजस्थानचा सामना होणार आहे.





