Nathan Ellis Ruled Out : आयपीएल २०२६ पूर्वी CSK ला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून पडला बाहेर; धोनीच्या ताफ्यात खळबळ
Nathan Ellis Ruled Out : न्नई सुपर किंग्सचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

CSK Nathan Ellis Ruled Out from IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला अवघे काही दिवस शिल्लक असताना सीएसकेला पहिला आणि सर्वात मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक वेगवान गोलंदाज नॅथन एलिस (Nathan Ellis) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून एलिसचे नसणे हा संघासाठी मोठा तोटा असल्याचे मान्य केले आहे.
डेथ ओव्हर्समध्ये निर्माण झाली पोकळी –
३१ वर्षीय नॅथन एलिस हा आपल्या अचूक यॉर्कर आणि स्लोअर बॉल्ससाठी ओळखला जातो. मथीशा पथिराणाला रिलीज केल्यानंतर डेथ ओव्हर्सची धुरा एलिसच्या खांद्यावर असेल, अशी आशा व्यवस्थापनाला होती. मात्र, त्याच्या दुखापतीमुळे आता सीएसकेला तातडीने बदली खेळाडूचा शोध घ्यावा लागणार आहे. एलिसला लिलावापूर्वी संघाने रिटेन केले होते, परंतु आता तो मैदानावर दिसणार नाही.
🚨 BIG BLOW FOR CHENNAI SUPER KINGS 🚨
– Nathan Ellis ruled out of the IPL 2026 due to an injury. [Sportstar] pic.twitter.com/7ZpWc7bbni
— Johns. (@CricCrazyJohns) March 19, 2026
परदेशी खेळाडूंचे चेन्नईत आगमन –
दुसरीकडे, के. एस. विश्वनाथन यांनी स्पष्ट केले की पश्चिम आशियातील तणावाचा परदेशी खेळाडूंच्या प्रवासावर कोणताही परिणाम झालेला नाही. अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमद आधीच चेन्नईत पोहोचला असून, जेमी ओव्हरटन आज रात्रीपर्यंत संघात सामील होईल. इतर खेळाडू देखील येत्या दोन दिवसांत सराव शिबिरात दाखल होतील.
सहाव्या जेतेपदाचे स्वप्न अधांतरी?
२०२३ मध्ये शेवटचे विजेतेपद मिळवल्यानंतर गेल्या दोन हंगामात चेन्नईला प्ले-ऑफपर्यंतही मजल मारता आली नव्हती. यंदा संजू सॅमसनच्या एन्ट्रीमुळे संघ भक्कम दिसत असतानाच, मुख्य गोलंदाज बाहेर पडल्याने गोलंदाजीच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो. आता व्यवस्थापन एलिसच्या जागी कोणत्या परदेशी गोलंदाजाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, संजू सॅमसन, आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, सर्फराझ खान, उर्विल पटेल, अंशुल कंबोज, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, प्रशांत वीर, खलिल अहमद, नूर अहमद, जॅक फॉल्क्स, अमन खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, गुरजपनीत सिंग, अकेल हुसेन, मॅट हेन्री, राहुल चहर.





