Vaibhav Suryavanshi Sixes : ६,६,६,६,६….सिक्सर किंग वैभवचा धुमाकूळ! २१ चेंडूत ठोकले तब्बल १० गगनचुंबी षटकार

Vaibhav Suryavanshi Sixes in U 19 vs SA U19 match : भारतीय क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखला जाणारा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघाविरुद्धच्या दुसऱ्या यूथ वनडे सामन्यात वैभवने षटकारांचा असा काही पाऊस पाडला की यजमान संघ पुरता हादरून गेला. वैभवने आपल्या खेळीतील पहिल्या २१ चेंडूत तब्बल १० षटकार खेचण्याचा पराक्रम केला.
पहिल्याच चेंडूवर षटकाराने सुरुवात –
वैभव सूर्यवंशी मैदानात उतरल्यापासूनच आक्रमक पवित्र्यात होता. त्याने आपली पहिलीच धाव वेगवान गोलंदाज बॅसॉनच्या चेंडूवर डीप बॅकवर्ड पॉइंटला षटकार मारून काढली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. फाईन लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर अशा मैदानातील सर्व कोपऱ्यांत त्याने चेंडू टोलवला. विशेष म्हणजे, त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत एकही चौकार मारला नाही, त्याने केवळ षटकारांच्या जोरावर आपली धावसंख्या उभारली.
एक षटकार इतका लांब मारला की चेंडूच हरवला!
Vaibhav Suryavanshi departs after a truly destructive knock 🔥
23 balls
68 runs
10 SIXES 💣
1 four
Strike Rate: 296 pic.twitter.com/Y5MuLU5EJW— Varun Giri (@Varungiri0) January 5, 2026
वैभवच्या बॅटीतून निघालेला सातवा षटकार इतका उत्तुंग होता की चेंडू थेट मैदानाच्या बाहेर गेला. बराच वेळ शोधूनही तो चेंडू सापडला नाही, ज्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. अखेर पंचांनी चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. चेंडू बदलला तरी वैभवच्या आक्रमक खेळीत बदल झाला नाही. त्याने १९ व्या चेंडूवर आपला ८ वा षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले.
२४ चेंडूत ६८ धावांची झंझावाती खेळी –
वैभवची ही वादळी खेळी अखेर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज क्रूसकॅम्पने संपुष्टात आणली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभव कव्हर्सच्या वरून कॅच देऊन बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने २४ चेंडूत ६८ धावा कुटल्या. यामध्ये १० षटकारांचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राईक रेट २८३.३३ इतका प्रचंड होता.





