Naseem Pollard Fight : ILT20 फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! पोलार्ड नसीम शाहच्या अंगावर धावून गेला, पाहा VIDEO

Naseem Pollard Fight in ILT20 2026 : इंटरनॅशनल लीग टी-२० (ILT20 2025-26) च्या फायनलमध्ये क्रिकेट चाहत्यांना हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ४ जानेवारी रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर डेझर्ट वायपर्स आणि एमआय एमिरेट्स यांच्यात झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि दिग्गज फलंदाज किरॉन पोलार्ड यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
११ व्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?
ही घटना एमआय एमिरेट्सच्या डावातील ११ व्या ओव्हरमध्ये घडली. नसीम शाहने गुड लेंथवर टाकलेला चेंडू पोलार्डने लेग साइडला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यानंतर नसीम शाह पोलार्डकडे रागाने पाहू लागला. पोलार्डनेही मागे न हटता नसीमकडे जाऊन त्याला प्रत्युत्तर दिले. दोघांमधील वाद वाढताना पाहून पंचांना मध्यस्थी करावी लागली.
Sparks fly in the middle! 🧨
The Final brings out many emotions, catching Naseem Shah & Kieron Pollard in the middle of it. ⚔️#Final #DVvMIE #DPWorldILT20 #WhereTheWorldPlays #AllInForCricket pic.twitter.com/PGUsSl3PaT
— International League T20 (@ILT20Official) January 4, 2026
नसीमचा ‘बदला’ आणि शानदार गोलंदाजी –
मैदानातील या वादाचा वचपा नसीम शाहने पोलार्डची विकेट घेऊन काढला. पोलार्ड २८ धावांवर खेळत असताना नसीमने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नसीमने अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करत ४ ओव्हर्समध्ये अवघ्या १८ धावा देऊन ३ महत्त्वाचे विकेट्स (पोलार्ड, आंद्रे फ्लेचर आणि टॉम बँटन) घेतले.
डेझर्ट वायपर्सने ट्रॉफीवर कोरलं नाव –
अंतिम सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना, डेझर्ट वायपर्सने ४ बाद १८२ धावा केल्या. करणने ७४ धावा करत महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यामध्ये त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर वायपर्सच्या गोलंदाजांनी एमआयला १८२ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. नसीम शाहने पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स घेतले, तर संघाच्या इतर गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. एमआयला १८.३ षटकांत १३६ धावांवर गुंडाळे.
सामन्यानंतर नसीम शाह काय म्हणाला?
नसीम शाहच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर डेझर्ट वायपर्सने एमआय एमिरेट्सचा ४६ धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना नसीम म्हणाला, “फायनलमध्ये वेगळा दबाव असतो. आमच्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात १०० टक्के योगदान दिले, ज्याचा निकाल सर्वांच्या समोर आहे.”





