Vaibhav Suryavanshi : वैभवचा ‘विराट’ पराक्रम! अवघ्या U-19 वर्ल्ड कप मध्ये रचला नवा इतिहास; मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

Vaibhav Suryavanshi set world record : अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्याच सामन्यात भारताच्या वैभव सूर्यवंशीने फलंदाजीत निराशा केली असली, तरी क्रिकेटच्या इतिहासात मात्र आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी विश्वचषकाच्या मैदानात उतरून वैभवने एक असा विक्रम प्रस्थापित केला आहे, जो मोडणे कठीण मानले जात आहे.
काय आहे ऐतिहासिक विक्रम?
वैभव सूर्यवंशी आता आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कप खेळणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. जेव्हा तो अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरला, तेव्हा त्याचे वय १४ वर्षे २९४ दिवस इतके होते. आतापर्यंत एकाही खेळाडूला वयाच्या १५ व्या वर्षापूर्वी वर्ल्ड कप खेळता आलेला नाही.
यापूर्वी हा विक्रम कॅनडाच्या नितीश कुमार याच्या नावावर होता. त्याने १५ वर्षे २४५ दिवस वय असताना २०१० मध्ये वर्ल्ड कप खेळला होता. वैभवने तब्बल १५ वर्षांनंतर हा विक्रम मोडीत काढला आहे.
मैदानावरील कामगिरी: स्वस्तात बाद –
भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अमेरिकेचा संघ अवघ्या ३५.२ षटकांत १०७ धावांवर गारद झाला. यानंतर वैभवच्या फटकेबाजीची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, एका आक्रमक फटक्याचा प्रयत्न करताना वैभव केवळ ४ चेंडूत २ धावा काढून बाद झाला. भारताची धावसंख्या १२ असतानाच तो बाद झाल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.
वैभव सूर्यवंशीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. पहिल्या सामन्यात अपयश आले असले, तरी त्याच्यातील गुणवत्ता पाहता आगामी सामन्यांमध्ये तो मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमींना आहे. सर्वात तरुण खेळाडू म्हणून त्याने इतिहास रचल्याने सध्या क्रिकेट जगतात त्याचेच नाव चर्चेत आहे.





