Vaibhav Sooryavanshi Injury : टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा वंडर बॉय वैभव सूर्यंवशीला सराव सत्रात गंभीर दुखापत
Vaibhav Sooryavanshi Injury : भारताचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त झाला आहे. या अनपेक्षित दुखापतीमुळे केवळ क्रिकेट चाहतेच नव्हे, तर भारतीय संघाच्या व्यवस्थापनाचीही चिंता कमालीची वाढली आहे.

Vaibhav Sooryavanshi Injury Update ahead IND A vs SL A : श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी ‘अ’ एकदिवसीय क्रिकेट मालिका २०२६ (Tri-Nation A Series) स्पर्धेदरम्यान भारतीय क्रिकेट गोटातून एक अत्यंत चिंताजनक आणि वाईट बातमी समोर आली आहे. यजमान श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भारताचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त झाला आहे. या अनपेक्षित दुखापतीमुळे केवळ क्रिकेट चाहतेच नव्हे, तर भारतीय संघाच्या व्यवस्थापनाचीही चिंता कमालीची वाढली आहे.
नेट्समध्ये फलंदाजी करताना अचानक उद्भवली समस्या –
मिळालेल्या माहितीनुसार, दांबुला येथील रंगीरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय ‘अ’ संघाचे सराव सत्र सुरू होते. यावेळी नेहमीप्रमाणे नेट्समध्ये जोरदार फलंदाजी करत असताना १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला अचानक शरीरात काहीतरी गंभीर वेदना आणि त्रास जाणवू लागला. या तीव्र वेदनांमुळे त्याला आपले फलंदाजीचे सत्र मध्येच थांबवावे लागले. तो बॅट बाजूला ठेवून थेट मैदानाबाहेर निघून गेला. या अचानक झालेल्या दुखापतीमुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारतीय संघाचे बिघडणार समीकरण –
Indian players leave the Rangiri International Stadium after a practice session. @sportstarweb pic.twitter.com/IpgcOoW5F1
— Shayan Acharya (@ShayanAcharya) June 14, 2026
टूर्नामेंटच्या दृष्टीने भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशा मोठ्या सामन्यापूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या वैभवसारख्या सलामीवीराची दुखापत टीम इंडियाचे पूर्ण संयोजन बिघडू शकते. सावधगिरीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकाने त्याला श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या प्लेइंग-११ मधून विश्रांती देण्याचा विचार केला आहे. मात्र, त्याच्या दुखापतीच्या तीव्रतेबाबत अद्याप बीसीसीआय किंवा संघ व्यवस्थापनाकडून अधिकृत वैद्यकीय निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
अफगाणिस्तानविरुद्ध केला होता धमाका –
या तिरंगी मालिकेची सुरुवात वैभव सूर्यवंशीसाठी फारशी चांगली झाली नव्हती आणि पहिल्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला होता. मात्र, गेल्याच सामन्यात अफगाणिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध त्याने केवळ २१ चेंडूंत ४४ धावांची अत्यंत स्फोटक आणि आक्रमक खेळी करून फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. तो लयीत आलेला असतानाच झालेल्या या दुखापतीमुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





