India Sixes Record : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये एकाच वर्षात तब्बल ‘इतके’ षटकार मारणारा ठरला जगातील पहिलाच संघ
India Sixes Record : भारतीय संघाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक असा पराक्रम करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे, जो यापूर्वी कोणत्याही संघाने केला नव्हता.

India Script History 400 T20I Sixes In Calendar Year 2026 : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारतीय संघाने षटकारांची आतषबाजी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नवा विक्रम नोंदवला आहे. २०२६ या एकाच कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार ठोकण्याचा अद्भूत पराक्रम भारतीय संघाने केला आहे. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात ४०० षटकारांचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला आहे. टीम इंडियाने अवघ्या ४० सामन्यांमध्ये हा ऐतिहासिक टप्पा गाठून आपल्या अफाट सिक्स-हिटिंग पॉवरचे दर्शन घडवले आहे.
नमन धीरच्या षटकाराने रचला इतिहास; एकट्या किवींविरुद्ध १४२ षटकार
हॅमिल्टन येथे खेळल्या जात असलेल्या या लढतीत युवा फलंदाज नमन धीर याने उत्तुंग षटकार खेचताच भारताच्या खात्यात या वर्षातील ४०० वा षटकार जमा झाला. अत्यंत रंजक बाब म्हणजे या ४०० षटकारांपैकी तब्बल १४२ षटकार भारताने एकट्या न्यूझीलंडविरुद्ध ठोकले आहेत. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही एका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने २० षटकांत ८ बाद १९१ धावा उभारून न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले.
संजू-अभिषेक अपयशी; श्रेयस अय्यर अन् इशान किशनचे वादळ –
🚨MOST SIXES IN T20I 2026🚨
•India : 400 Sixes
•West Indies: 373 Sixes….see morehttps://t.co/XBWjZE2Hsv
— ALeem ALam (@ALeemALam07) November 1, 2026
डावाची सुरुवात करताना संजू सॅमसन (४) आणि अभिषेक शर्मा (१) स्वस्तात बाद झाले. मात्र, मागील सामन्यात शून्यावर बाद झालेल्या इशान किशनने ३२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६१ धावांची वादळी खेळी केली. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने तोडीस तोड साथ देत अवघ्या २३ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ५० धावांचे तडाखेबंद अर्धशतकी खेळी साकारली.
नमन धीर आणि नितीश रेड्डीची अखेरच्या षटकांत फटकेबाजी –
तिलक वर्मा (६) अपयशी ठरल्यानंतर नमन धीरने २३ चेंडूंत ३३ धावा आणि नितीश कुमार रेड्डीने १७ चेंडूंत २२ धावा करत भारताची धावसंख्या पावणेदोनशेच्या पुढे नेली. भुवनेश्वर कुमारने ४ चेंडूंत नाबाद ६ धावा जोडल्या. या सांघिक फटकेबाजीच्या जोरावर भारताने ८ बाद १९१ धावांची आव्हानात्मक मजल मारत न्यूझीलंडवर विजयासाठी दबाव निर्माण केला.





