Vaibhav Sooryavanshi Brother : ‘दो भाई, दोनो तबाही…’, वैभव सूर्यवंशीच्या लहान भावाचा मोठा धमाका; झळकावलं पहिलंवहिलं शतक
Vaibhav Sooryavanshi Brother : वैभवचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी यानेही बिहारच्या स्थानिक मैदानावर आपल्या बॅटचा जलवा दाखवत कारकिर्दीतील पहिलेवहिले शानदार शतक झळकावले आहे.

Vaibhav Sooryavanshi Brother Ashirwad Sooryavanshi Century : भारतीय क्रिकेटचा १५ वर्षीय वंडर बॉय वैभव सूर्यवंशी सध्या श्रीलंका दौऱ्यावर ‘भारत अ’ संघाकडून धावांचा पाऊस पाडत असतानाच, आता त्याच्या घरातून आणखी एका नव्या ‘रनमशीन’चा उदय झाला आहे. वैभवचा लहान भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी यानेही बिहारच्या स्थानिक मैदानावर आपल्या बॅटचा जलवा दाखवत कारकिर्दीतील पहिलेवहिले शानदार शतक झळकावले आहे. आशीर्वादने समस्तीपूर येथे झालेल्या एका स्थानिक सराव सामन्यात हा पराक्रम केला.
८३ चेंडूंत १०३ धावा; शांत अन् संयमी खेळी –
मोठा भाऊ वैभव सूर्यवंशी मैदानावर येताच जशी तुफानी फटकेबाजी करतो, तसा अंदाज न ठेवता आशीर्वादने अत्यंत संयमी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ८३ चेंडूंत १०३ धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने मैदानाभोवती चौकारांची आतिषबाजी करत २० चौकार आणि १ गगनचुंबी षटकार लगावला. अखेर प्रशांत राजच्या गोलंदाजीवर आयुष सिंहने कॅच पकडल्याने त्याची ही खेळी संपुष्टात आली. आशीर्वादच्या या पहिल्या शतकाची माहिती त्याचा मोठा भाऊ उज्ज्वल सूर्यवंशी याने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्कोरकार्ड आणि सामन्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिली.
दोन वर्षांत दुसरा ‘वैभव’ बनवणार; वडिलांचा शब्द खरा ठरला –
Meet Ashirvad Sooryavanshi, the younger brother of Vaibhav Sooryavanshi.
Ashirvad is around 12 years old and, like his brother, is preparing himself to become a cricketer.
Just like Vaibhav, Ashirvad Sooryavanshi is an opening batsman. Today, he scored a brilliant century,… pic.twitter.com/RzSsGSXdIK
— Saffron Chargers (@SaffronChargers) June 12, 2026
लहान मुलाच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याचे वडील संजीव सूर्यवंशी अत्यंत भावूक आणि आनंदी झाले आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहीत म्हटले, “माझ्या लहान मुलाने आज सराव सामन्यात त्याचे पहिले शतक झळकावले आहे. आपण सर्वांनी जसे वैभववर प्रेम केले, तसेच आशीर्वादवरही आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवावा.”
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, “पुढील दोन वर्षांत मी माझ्या लहान मुलाला (आशीर्वादला) देखील वैभवसारखाच स्टार खेळाडू बनवून दाखवेन.” त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच आशीर्वादने शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
एक भाऊ श्रीलंकेत, तर दुसरा बिहारमध्ये गाजवतोय मैदान –
सूर्यवंशी कुटुंबाचे दोन हिरे सध्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी मैदाने गाजवत आहेत. वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वाधिक धावा करत ‘ऑरेंज कॅप’ आपल्या नावावर केली होती. सध्या तो श्रीलंकेत अफगाणिस्तान आणि यजमान संघाविरुद्ध सलामीवीर म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, तर दुसरीकडे त्याचा भाऊ आशीर्वाद बिहारमध्ये स्थानिक क्रिकेट गाजवून मुख्य संघात येण्यासाठी सज्ज होत आहे.





