खेड, रत्नागिरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटक वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली मनातील खदखद व्यक्त केली आहे. पक्षातून हकालपट्टीच्या कारवाईनंतर खेडेकर यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करताना, “फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन,” असे ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी लवकरच मेळावा घेण्याची घोषणा केली आणि योग्य वेळी पुढील निर्णय घेण्याचे संकेत दिले. खेडेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, संतोष नलावडे आणि सुबोध जाधव यांनाही पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कोकणातील मनसेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षातून बडतर्फीचे पत्र: निष्ठेचे सर्टिफिकेट पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर यांनी पक्षातून बडतर्फीच्या पत्राबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “हे पत्र वाचून मला अतिशय दुख: झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे,” असे भावूक होत खेडेकर म्हणाले. त्यांनी मनसेच्या स्थापनेपासून कोकणात पक्षाची बीजे रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला. “मी अनेक आंदोलने केली, तुरुंगवास भोगला, प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला. खेड नगरपरिषद पंधरा वर्षे मनसेकडे ठेवण्यात माझा मोठा वाटा आहे. मी थेट नगराध्यक्ष झालो आणि कोविड काळातही लोकांसोबत राहिलो,” असे त्यांनी सांगितले. कोकणात पक्षाच्या उभारणीत त्यांनी घेतलेल्या मेहनतीवर प्रकाश टाकताना त्यांनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. भाजप भेटीमुळे कारवाई? वैभव खेडेकर यांनी पक्षातून बडतर्फीमागील कारणावर भाष्य करताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) काही नेत्यांना भेटलो म्हणून त्यांच्यावर पक्षांतराचा संशय घेतला गेला. “मी पक्षांतर करणार नव्हतो. कार्यकर्त्यांवरील तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी मी भाजप नेते नितेश राणे यांना भेटलो होतो,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. विकासाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी नेत्यांशी भेटीगाठी होत असतात, परंतु त्यामुळे आपल्यावर कारवाई झाल्याचे त्यांनी नमूद केले. “माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत,” असे सांगताना खेडेकर यांनी आपली खंत व्यक्त केली. राज ठाकरेंबद्दल आदर, पण कौटुंबिक नात्याला तडा पत्रकार परिषदेत वैभव खेडेकर भावूक होताना दिसले. “जर हे पत्र स्वत: राज साहेबांनी काढले असते, तर त्याचा आदेश म्हणून मी आनंद मानला असता. पण मी कधीही पक्षाची शिस्त बिघडवणारे काम केले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. “३० वर्षे मी पक्षाशी आणि कुटुंबाशी जोडले गेलो होतो. आजच्या पत्राने त्या कौटुंबिक नात्याला ब्रेक लागला. हे पत्र मला कधीच अपेक्षित नव्हते,” असे सांगताना खेडेकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. “राज साहेब, तुम्ही कालही माझ्या मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. पुढील वाटचाल आणि मेळाव्याची घोषणा वैभव खेडेकर यांनी पक्षातून बडतर्फी स्वीकारत पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. “हातात घेतलेले शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही. मी घाई करणार नाही, योग्य वेळी पुढील निर्णय घेईन,” असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे आणि पुढील दिशा ठरवण्याचे त्यांनी जाहीर केले. “फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन. ही घटना नाकारता येत नाही, पण ती स्वीकारून मी पुढे जाईन,” असे सांगत त्यांनी आपली आक्रमकता आणि आत्मविश्वास दाखवला. तसेच, इतर पदाधिकाऱ्यांनीही यानिमित्ताने विचार करण्याची वेळ आल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मनसेसाठी धक्का वैभव खेडेकर यांच्यासारख्या प्रभावी नेत्याची पक्षातून हकालपट्टी ही मनसेसाठी मोठा धक्का मानली जात आहे. कोकणात, विशेषत: खेड आणि दापोली परिसरात खेडेकर यांचा मजबूत जनसंपर्क आणि तरुणांमधील लोकप्रियता यामुळे पक्षाला त्यांच्या अनुपस्थितीत नव्याने संघटन बांधणी करावी लागेल. खेडेकर यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे आणि त्यांच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या भावूक पत्रकार परिषदेने कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत.