Vadgaon Maval : वराळे ग्रामस्थांचा पुनर्वसनाला विरोध; गुंजवणी प्रकल्पग्रस्तांबाबत ग्रामस्थांची भुमिका
Vadgaon Maval : एक इंचही जागा पुनर्वसनासाठी देणार नसल्याचा ग्रामस्थांचा निर्धार

Vadgaon Maval : – भोर-वेल्हे तालुक्यातील गुंजवणी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वराळे गावातील गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. गावाच्या विकासासाठी उपलब्ध जमीन आवश्यक असल्याने यापुढे एक इंचही जागा पुनर्वसनासाठी देणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पवना आणि आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नसताना इतर तालुक्यांतील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मावळमध्ये करण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याची भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
ग्रामस्थांनी सांगितले की, वराळे गावाकडे एकूण ६४ एकर गायरान जमीन असून त्यापैकी २१ एकर जमीन यापूर्वीच पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे. स्थानिक धरणग्रस्तांना मदत करण्यास विरोध नसला तरी गावाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता आता कोणतीही जमीन उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या वराळे ग्रामपंचायत हद्दीत २० ते २५ हजार लोकसंख्या वास्तव्यास असून क्रीडांगण, शालेय मैदान, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, एसटीपी, सार्वजनिक मंदिर, बैलगाडा घाट, तळ्याचे सुशोभीकरण तसेच यात्रा-उत्सवांसाठी जागेची आवश्यकता आहे.
त्यामुळे शासनाच्या विविध विकास योजनांसाठीही जमीन शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला नितीन मराठे, ज्ञानेश्वर मराठे, अतुल मराठे, निलेश शिंदे, विशाल मराठे, तानाजी मराठे, ॲड. ओंकार मराठे, अरुण मराठे, हभप अण्णासाहेब मराठे, तुकाराम मराठे, संगीता मराठे, ताईबाई मराठे, अर्चना मराठे, अरुणा मराठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पॉवर ऑफ ॲटर्नीबाबत फसवणुकीचा आरोप
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित एक एकर शासकीय जमीन प्रकल्पग्रस्त बबन बंबाजी पवार यांच्या नावे शासनाने दिली आहे. मात्र अशा शासकीय गायरान जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी करता येत नसतानाही हभप चैतन्य महाराज वाडेकर यांनी ती केल्याचा दावा करण्यात आला. न्यायालय व शासनाची दिशाभूल करून जागेचा ताबा मिळविण्याचा आदेश घेतल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
दोन ठिकाणी जमीन मिळविण्याचा प्रयत्न?
माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी आरोप केला की, प्रकल्पग्रस्त बबन बंबाजी पवार यांना सन २००७ मध्ये शिरूर तालुक्यात जमीन मिळालेली असतानाही त्यांनी वराळे येथील जमिनीवर हक्क सांगत खोटी पॉवर ऑफ ॲटर्नी केल्याची शंका आहे. तसेच गावाच्या वाढीव विस्तारासाठी १७ हेक्टर जमीन शासनाच्या आदेशानुसार नियमित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.





