HSRP Number Plate: वाढीव मुदतीत फक्त १७ हजार एचएसआरपी
HSRP Number Plate:

अनेकवेळा मुदतवाढ देऊनही १३ लाख वाहनधारकांची उदासीनता
HSRP Number Plate: राज्य परिवहन विभागाने २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसवण्यासाठी दिलेली अंतिम मुदत आज (दि. ३०) संपली. एचएसआरपीसाठी मागील दीड वर्षात अनेकदा मुदतवाढ दिली होती.
नव्याने दिलेल्या दीड महिन्याच्या मुदतीतही केवळ १७ हजार वाहनांनी एचएसआरपीसाठी अर्ज दाखल केले आहेत. आजही शहरात १३ लाख वाहने एचएसआरपीविना रस्त्यावर धावत आहे. या वाहनधारकांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
राज्यात २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे. मात्र, पुणे शहरासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत एचएसआरपी बसविण्याबाबत वाहनचालकांमध्ये उदासीनता दिसून आली.
त्यानुसार राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यास ३० जूनपर्यंत पुन्हा मुदत दिली. त्याचवेळी ज्या वाहनांवर एचएसआरपी नाही किंवा नोंदणी केलेली नाही, असा सर्व वाहनांवर १ जुलैपासून दंडात्मक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, पुणे शहरात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यातील ११ लाख ५० हजार ८३७ वाहनांनी नंबर प्लेट बसविण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील ११ लाख ४७ हजार ८९ जणांना नंबरप्लेट बसविण्यास वेळ दिली असून, ९ लाख ४४ हजार ९२४ वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवून घेतली आहे.
२ लाख २ हजार १६५ जणांना तारीख मिळाली असून, त्यातील काहींना तारीख देऊनही त्यांनी अद्याप नंबरप्लेट बसवून घेतली नाही. काहींची नंबरप्लेट आली नसल्याच्या तक्रारीही आहेत.
प्रतिसादच नाही HSRP Number Plate:
राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी बसविण्यासाठी १५ मे रोजी ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामुळे नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळेल असे वाटत होते. मात्र, गेल्या दीड महिन्यांत केवळ १७ हजार जणांनी एचएसआरपीसाठी अर्ज केल्याचे दिसून आले. दि. १५ मे रोजी ११ लाख ३४ हजार जणांनी नोंदणी केली होती. आज ही संख्या ११ लाख ५१ हजार इतकी आहे.




