Vadgaon Maval : मावळात धूलिवंदन उत्साहात; पारंपारिक रिती-रिवाजांनुसार रंगांची मुक्त उधळण

Vadgaon Maval : मावळ तालुक्यात होळी अर्थात शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवारी (दि. २) सायंकाळी गावोगावी होळी प्रज्वलित करण्यात आली, तर मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची मुक्त उधळण करत सर्व वयोगटातील नागरिकांनी जल्लोषात सहभाग नोंदवला. ग्रामीण भागासह शहरी परिसरातही पारंपरिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेले होते.
तालुक्यातील वडगाव, तळेगाव, कामशेत, पवनानगर परिसरासह विविध गावांत सायंकाळी ग्रामदैवताच्या मंदिरासमोर आणि गावाच्या वेशीवर परंपरेनुसार होळीची पूजा करण्यात आली. एरंडीचे झाड, लाकडे, गोवऱ्या आणि इतर साहित्य गोळा करून सामूहिक होळी पेटवण्यात आली. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
अनेक गावांमध्ये ग्रामदैवताच्या मंदिरात भजन, कीर्तन पार पडले. तर काही ठिकाणी पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ग्रामीण भागातील शिमग्याची पारंपरिक झलक यंदाही ठळकपणे अनुभवायला मिळाली. तालुक्यातील सर्वच भागात होळी आणि धुलीवंदन सण शांततेत व उत्साहात पार पडल्याचे चित्र दिसून आले.
खालापूरात धुलीवंदनाची रंगत
खालापूर तालुक्यात धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरा करण्याची परंपरा असून, यास धुलीवंदन असेही म्हटले जाते. सकाळपासूनच तरुणाई रंग आणि पाण्याच्या फुग्यांसह रस्त्यावर उतरली होती. रंगाने माखलेले चेहरे आणि रंगीत पाण्याने चिंब भिजलेली लहान मुले असे जल्लोषमय चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळाले. शहरी भागातही पारंपरिक पद्धतीने रहिवाशांनी एकत्र येऊन सामूहिक धुलीवंदन साजरे केले.
शिमग्याची सांस्कृतिक परंपरा
होळी हा संपूर्ण भारतात उत्साहाने साजरा होणारा सण असून महाराष्ट्रातील काही भागात त्याला शिमगा म्हणून ओळखले जाते. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत काही ठिकाणी दोन दिवस तर काही भागांत पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. होलिकोत्सव आणि रंगपंचमी अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणूनही या सणाला संबोधले जाते.
काही ठिकाणी एक गाव एक होळी
ग्रामीण भागातील काही ठिकाणी संपुर्ण गाव एकत्र येऊन एकच होळी पेटवण्यात आली, तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेशात होळीची विधिवत पूजन केले. यावेळी पुरणपोळीचा नैवेद्य होळीला अर्पण करण्यात आला. सोबतच होळीभोवती पाणी घालून पाच फेऱ्या मारण्यात आल्या तसेच होळीत नारळ अर्पण करण्यात आले.
नारळ बाहेर काढण्यासाठी मुलांनी काठ्यांच्या साहाय्याने प्रयत्न केले. त्यानंतर नारळाचा प्रसाद वाटण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागातील बाजारपेठेत तरुणांचे घोळके रंग खेळताना दिसून आले. नागरिकांनी सणाचा आनंद साजरा करत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.





