लसीकरणाची “हर घर दस्तक” मोहीम

पुणे – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे करोनावर नियंत्रण ठेवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. जिल्ह्यातील अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. मात्र, आजही काहींचा लसीचा पहिला आणि दुसरा डोस राहिलेला असून शंभर टक्के लसीकरणाच्या उद्दीष्टापासून ग्रामीण भाग दूर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतर्फे “हर घर दस्तक’ मोहिम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी दिली. या अंतर्गत लसीकरण न झालेल्या नागरिकांची यादी बनविण्यात येणार असून त्यांना थेट त्यांच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात करोना प्रसाराचा वेग नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. जिल्हा परिषदेने यासाठी विविध मोहिमा राबविल्या, याचे चांगले परिणाम सध्या दिसत आहे. त्यात लसीकरणाचा वेग वाढल्यानेही करोना नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे.
पुणे जिल्ह्यात जवळपास दिड कोटी नागरिकांनी लस घेतली आहे. मात्र, असे असतांनाही अनेकांचा पहिला डोसही पूर्ण झालेला नाही. जिल्ह्याची एकुण लोकसंख्या 46 लाख 71 हजार 579 एवढी आहे. त्यातील 31 लाख 50 हजार 151 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे उद्दीष्ट हे पूर्ण झालेले नाही. परिणामी, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागिरकांचे लसीकरण करण्यासाठी “हरघर दस्तक’ ही मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी सुक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांची यादीही बनविण्यात आली आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी जनजागृतीसाठी पोम्प्लेटस, पोस्टर्स तयार करणऱ्यात आले आहे. स्थानिक आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका मार्फत गृहभेटीचे नियोजन करण्यात आले आहे. पात्र, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व पदाधिकारी, यांचेमार्फत गावातील प्रत्येक घरा-घरामध्ये जाऊन गण व प्रभागातील लोकांना लसीकरणाबाबत जनजागृत करणार आहे.
जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या लसीकरणाचे पथक घरोघरी जाऊन वंचित राहिलेल्या लोकांना नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याबाबत आवाहन करत आहेत. प्रत्यक्ष लसीकरण करुन घेणे बद्दल चांगल्या प्रकारे प्रचार, जनजागृती,आरोग्य शिक्षण हे सर्व पुणे जिल्हा परिषदेच्या प्रसिद्धी विभागाकडून केली जात आहे.
– प्रमोद काकडे, सभापती, आरोग्य आणि बांधकाम





