पुणे – व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, त्यानंतर रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार संबंधीत संस्थेतील रिक्त जागांवर प्रवेश घ्यावा, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार आता पदवी व पदव्युत्तरच्या प्रवेशासाठी पहिली फेरी झाली असून, दुसरी फेरीही लवकरच जाहीर होणार आहे. त्यानंतरही प्रवेश निश्चित न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संस्था निहाय, अभ्यासक्रमनिहाय, संवर्गनिहाय रिक्त जागांची सविस्तर माहिती देण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थी व पालकांनी रिक्त जागांवर पात्रतेचे निकष पूर्ण करीत असल्यास त्या संबंधीत संस्थेशी संपर्क साधावा. त्या संस्थेत प्रवेश घ्यावा, असेही राज्य सीईटी सेलने म्हटले आहे.
दरम्यान, दोन प्रवेश फेरी पूर्ण होताच संस्थास्तरावर प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. अशा परिस्थितीत संस्थास्तरावर प्रवेश न घेता आणखी एक प्रवेश फेरी घेण्याची मागणी पालकांतून होत आहे. तथापी, संस्थास्तरावर रिक्त जागेवर प्रवेश घेतल्यास त्या ठिकाणी आरक्षण आणि शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही, असेही पालकांचे म्हणणे आहे.