अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना तूर्तास दिलासा, राज्य सीईटी सेलने घेतला महत्वपूर्ण निर्णय

पुणे – अभियांत्रिकी, फार्मसीसह सर्व व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. मात्र प्रवेश निश्चिती करण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांकडे सर्व मूळ कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने प्रमाणपत्र सादर केलेल्या पावतीच्या आधारे महाविद्यालयत प्रवेश निश्चित करावा, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रमाणपत्राच्या पावतीच्या आधारे अर्ज स्वीकारण्यात आले. त्याचवेळी विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करताना सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. या अटीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या प्रथम फेरीत त्या त्या राखीव प्रवर्गातून गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी निवड करण्यात आली. त्याप्रमाणे विशेषत: जाता वैधता प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस, नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट, जातीचा दाखला अशी कागदपत्रे मिळण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील होते. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना संबंधित कार्यालयामार्फत कागदपत्रे मिळाले नसल्याचे दिसून आले.
त्या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने आज परिपत्रक प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कागदपत्र सादर केलेल्या पावतीच्या आधारे प्रवेश निश्चित करण्यात येईल. हा प्रवेश तात्पुरता प्रवेश म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सर्व विद्यार्थ्यानी द्वितीय प्रवेश निश्चितीच्या अंतिम दिनांकाच्या आता संबंधित विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा हे प्रवेश रद्द करण्यात येतील, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त आर. एस. जगताप यांनी दिली.





