आर.एम.डी. फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारिवाल यांचे प्रतिपादन साध्वी शीलापीजी म.सा., डॉ. कुमुदलताजी म. सा. यांनीही केले मार्गदर्शन पुणे – जैनधर्मीय बांधवांमध्ये महामंगलकारी स्तोत्र अशी श्रद्धा असणाऱ्या उवसग्गहरं स्तोत्राच्या सामूहिक पठणाचा कार्यक्रम पर्युषण पर्वाच्या पूर्वसंध्येला साध्वी शीलापीजी म. सा. विरायतन बिहार, तसेच साध्वी डॉ. कुमुदलताजी म. सा. (आदिठाणा-4) यांच्या प्रमुख व पावन उपस्थितीत पार पडला. श्रीमान रसिकलाल धारिवाल स्थानक, यश लॉन्स, बिबबेवाडी पुणे येथे आयोजित हा धार्मिक कार्यक्रमास हजारो जैन-अजैन भाविकांची उपस्थिती होती. आर. एम. डी. फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन, उपाध्यक्ष शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मागील सात वर्षांपासून अविरतपणे या स्तोत्र पठणाचे आयोजन करून केवळ जैन धर्माचेच नव्हे, तर सर्व भारतीय समाजबांधवांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठीच या स्तोत्राचे आयोजन केले जाते. तसेच या स्तोत्राच्या नियमित पठणामुळे दृष्टग्रह, रोगपीडा, शत्रू आदी सांसारिक दुःखपीडा दूर होतात. याद्वारे मनुष्य प्राणीमात्रांमध्ये सुख-समृद्धी प्राप्त होते. याचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवल्याचे व आपणही अनुभवा, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रास्तविक व उपस्थितांच्या स्वागतावेळी शोभाताई धारिवाल यांनी केले. भगवान पार्श्वनाथ स्वामी यांच्या उवसग्गहरं स्तोत्राचे नियमित पठण केल्याने सर्व कष्ट, समस्या यांचे निराकरण होते. तसेच दिव्यशक्तीचा अनुभव येतो. या स्तोत्राद्वारे भगवान पार्श्वनाथ यांच्याशी एकरूप व्हावे, असे आवाहन यावेळी साध्वी शीलापीजी म.सा. यांनी केले. “एवढ्या मोठ्या अनुष्ठानाचे यशस्वी आयोजन शोभाताई धारिवाल यांनी केले. याद्वारे त्यांच्यातील नारीशक्तीचे दर्शन होते,’ असे गौरवोद्गार डॉ. कुमुदलताजी म. सा. यांनी काढले. “वर्षभर चांगले काम करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा या स्तोत्राद्वारे प्राप्त होते,’ अशी भावना जान्हवी धारिवाल-बालन यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी पुनीत बालन गृपचे अध्यक्ष, युवा उद्योजक पुनीत बालन, आर. एम. डी. स्थानकचे अध्यक्ष पोपटशेठ ओसवाल व सर्व पदाधिकारी, विविध जैन संस्थाचे पदाधिकारी, नामवंत उद्योजक, शोभाताई आर. धारिवाल वसतिगृह एफसी रोड, शोभाबेन आर. धारिवाल, छात्रालय डेक्कन व शोभाताई आर.धारिवाल वसतिगृह, चिंचवड येथील विद्यार्थी, गणेश मंडळे, आळंदी येथील वारकरी संप्रदायाचे भाविक तसेच जैन-अजैन बंधू-भगिनी यावेळी उपस्थित होते.