Uttarkashi Accident : चारधाम (Chardham) प्रकल्पांतर्गत निर्माणाधीन असलेल्या बोगद्यात ४० कामगारांचा जीव ५० तासांहून अधिक वेळापासून अडकून पडला आहे. या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजही जलद गतीने बचावकार्य सुरूच ठेवण्यात आले आहे. रविवारपासून अडकलेल्या या कामगारांना वाचविण्यासाठी आता स्टीलच्या पाइपचा मार्ग तयार करण्यात येत असून या बचावकार्याला आणखी २४ तासांचा कालावधी लागू शकतो, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बोगद्यात दगडमातीचा ढिगारा तयार झाला असून तो हटविताना पुन्हा माती खाली कोसळत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. यासाठी संपूर्ण ढिगाऱ्यावर विशेष यंत्राच्या सहाय्याने शॉटक्रेटिंग प्रक्रियेद्वारे (काँक्रीटचा फवारा) सिमेंटची फवारणी करण्यात येत आहे. रविवारी सकाळी दिवाळीच्या दिवशी उत्तरकाशीमध्ये (Uttarkashi) मोठा अपघात झाला. चारधाम प्रकल्पांतर्गत बांधकाम सुरू असलेल्या सिल्क्यरा-पोळ गाव बोगद्यात ५० तासांहून अधिक काळ अडकून ४० कामगारांचा जीव अडकून पडला आहे. यामध्ये २७० मीटर आत ३० मीटरचा भाग भूस्खलनामुळे बंद झाला आहे. दरम्यान, सातत्याने माती पडत असल्याने आता या ढिगाऱ्यात ९०० मिमी व्यासाचे स्टीलचे पाइप टाकून कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. ड्रिलिंग करून हे स्टीलचे पाइप आत टाकण्यात येणार आहे. ड्रिलिंगसाठी आगर मशिन व स्टीलचे पाइप घटनास्थळी पोहोचले आहेत. कामगारासाठी पाईपद्वारे औषध पुरवठा ! या घटनेत एका कामगाराची प्रकृती खालावल्याने बोगद्यात खळबळ उडाली होती, कामगारासाठी पाईपद्वारे औषध पाठवण्यात आली. उत्तरकाशी. बोगद्याच्या आत एक कामगार आजारी पडला. त्याला चक्कर आली आणि किंचित उलट्या झाल्या, त्यामुळे अडकलेल्या इतर कामगारांमध्ये घबराट पसरली. पाण्याच्या ड्रेनेज पाईपद्वारे शोध आणि बचाव पथकाला कामगारांनी ही माहिती दिली होती. घटनास्थळीच उभारले तात्पुरते रुग्णालय ! घटनास्थळाजवळच सहा खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे, अशी माहिती उत्तरकाशीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आर.सी. पवार यांनी दिली. याशिवाय दहा ॲम्बुलन्स व वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. अडकलेले मजूर बाहेर आल्यानंतर त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ही सज्जता करण्यात आली आहे.