उत्तर प्रदेश : नमाज पठणासाठी गेलेल्या गावकऱ्यांना अज्ञात जमावाकडून धक्काबुक्की

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील गुरुग्राम येथील भोसा कालन गावामध्ये एका मशिदीमध्ये अज्ञात जमावाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नुतनीकरणाच्या नावाखाली मशिदीकडून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या जमावाने केला. गेल्या आठवड्यामध्ये या मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरु झाल्यापासून आम्हाला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुधवारी याच प्रकरणामध्ये २०० जणांनी मशिदीमध्ये घुसखोरी करुन प्रार्थना करणाऱ्यांना धक्काबुक्की करत हुज्जत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
गावातील नझर मोहद या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दोन वेळा या जमावाने मशिदीमध्ये घुसखोरी केली. “जवळजवळ २०० जणांनी आम्हाला घेरलं. त्यांनी मशिदीमध्ये प्रवेश केला. आम्हाला गाव सोडून जाण्याची धमकी दिली. आम्ही केवळ चार मुस्लीम कुटुंबं या गावात राहतो. आम्हाला रोज त्रास दिला जातो. रात्री आम्ही नमाज पठण करत असताना काही लोकांनी हल्ला केला. यात काही जण जखणी झाले. त्यांनी आता प्रार्थना करतो या संपूर्ण परिसरालाच टाळं लावले आहे. त्यांच्याकडे बंदूका होत्या. आम्ही पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे,” असे नझर यांनी सांगितले. या तक्रारीनंतर पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवला आहे.
अनेक वर्षांपूर्वी या कुटुंबांनी एक छोटी मशिदी बांधली होती. त्यामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण झालेला. या परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, अशी माहिती पतौडीचे सहाय्यक पोलीस निर्देशक हरिंद्र कुमार यांनी दिली. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आम्ही दोन्ही समाजातील व्यक्तीबरोबर चर्चा करत आहोत, असे कुमार यांनी सांगितले.




