उत्तर प्रदेशातील चकमक वादाच्या भोवऱ्यात; गोमांस तस्करांना पोलिसांनी मारल्या एकाच ठिकाणी गोळ्या

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये गोमांस तस्करांशी झालेली पोलिसांची चकमक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या चकमकीत सात जणांना गुडघ्यापासून काही इंच खाली गोळ्या घातल्या गेल्या. या चकमकीमुळे सर्वांना एकाच ठिकाणी गोळ्या लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे या सातही जणांना पोलिसांनी गोहत्येच्या आरोपाखाली पकडले आहे. त्याचवेळी गोदामातून दोन दुचाकी, तीन जनावरांचे मृतदेह, सात पिस्तुले, काडतुसे जप्त करण्यात आले. ११ नोव्हेंबरला सकाळी ६.१० वाजला बेहता हाजीपूर येथील रद्दीच्या गोदामावर पोलिसांनी छापा टाकला. गोदामात बंदी असलेल्या जनावरांची कत्तल केली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये चकमकीनंतर सात तस्करांना अटक करण्यात आली. ही चकमक आता चर्चेचा विषय बनली आहे.
जखमी आरोपींच्या फोटोत ते हॉस्पिटलमधील दगडी बाकावर फिल्मी स्टाईलमध्ये एकत्र बसलेले आहेत. सगळ्यांना जवळपास एकाच ठिकाणी एकाच पायात गोळ्या घालण्यात आल्या आहेत. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण त्यांचे लक्ष्य चुकले. त्यातील एक गोळी पोलिसांच्या गाडीला लागली. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युतरादाखल गोळीबार केला. मात्र आता तस्करांच्या एन्काउंटरबाबत गाझियाबाद पोलिसांना प्रश्नांनी घेरले गेले आहे. या चकमकीत एका अल्पवयीन मुलाला देखील गोळी लागल्याचे समोर आले आहे.
अल्पवयीन असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाच्या वयाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी, चकमकीनंतर, पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोहत्येच्या माहितीवरून पोलिसांचे पथक गोदामावर छापा टाकण्यासाठी गेले असता, आरोपींनी गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.





