आयात शुल्क लादण्याची अमेरिकेची कृती दुर्देवी; काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : भारतासह विविध देशांवर आयात शुल्क लादण्याची अमेरिकेची कृती दुर्दैवी आणि एकतर्फी असल्याची भूमिका कॉंग्रेस पक्षाने शनिवारी मांडली. अमेरिकी कृतीला प्रतिसाद देताना मोदी सरकारने देशहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच, संबंधित मुद्द्यावर विविध राजकीय पक्षांना आणि त्या मुद्द्याशी निगडीत असणाऱ्या घटकांना विश्वासात घ्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेले पाऊल जागतिक व्यापारासाठी मोठा हादरा आहे. अमेरिकेची कृती अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यातून जगभरातील लहान-मोठ्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होऊ शकेल. ट्रम्प यांच्या निर्णयाने बहुराष्ट्रीय व्यापार व्यवस्थेत उलथापालथ होईल.
तो निर्णय जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि जागतिक व्यापार संघटनेलाही (डब्लूटीओ) मोठा झटका देणारा आहे. नियमाधारित जागतिक व्यापार चालवण्याची जबाबदारी डब्लूटीओवर आहे. नियमाधारित व्यवस्थेशिवाय व्यापार होऊ शकत नाही. मात्र, ट्रम्प यांची कृती आंतरराष्ट्रीय करार, नियम आणि तत्वांचे उल्लंघन करणारी आहे, असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सोडले.
अमेरिकी कृतीवर मोदी सरकारने अधिवेशन सुरू असताना संसदेत चर्चा करायला हवी होती. आता तरी सरकारने विश्वासात घेऊन राजकीय पक्षांशी चर्चा करावी. प्रतिसादाचा निर्णय घेताना सरकारने देशाला विश्वासात घ्यावे. देशावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची दक्षता म्हणून घाईने कुठला निर्णय घेतला जाऊ नये. सरकारने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अनुभव असणाऱ्या तज्ञांचे राष्ट्रीय कृती दल स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.





