नगर (प्रतिनिधी) – नगर शहरात करोना विषाणूचा प्रार्दूभाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नगर शहरातील अनेक रुग्णांना रेमडेसिविर, ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटीलेटर्स उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी अत्यंत तातडीने प्रस्ताव तयार करा. त्यासाठी महापौर शहर विकासनिधीत प्रस्तावित करण्यात आलेले दोन कोटी रुपये वापरावेत, अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना केली आहे.
महापालिकेच्या चालूवर्षीच्या अंदाजपत्रकात महापौर शहर विकास निधीत 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यास ऑनलाइन महासभेने मान्यताही दिली आहे. मात्र, नगरमध्ये सध्या कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधा प्राधान्यक्रमाने उभ्या करणे अत्यंतिक गरजेचे आहे. त्यामुळे या निधीतून कोविड रुग्णांसाठी व एकूणच नगरमधील वैद्यकीय बाजू भक्कम करण्यासाठी या निधीचा वापर करावा, अशी सूचना महापौर वाकळे यांनी आयुक्तांना केली आहे.
नगर शहरात सध्या रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठाच तुटवडा निर्माण झाला आहे. महानगरपालिका कर्मचार्यांसाठी देखील ते अत्यावश्यकच आहे. त्यामुळे महापौर शहर विकास निधीतून किमान एक हजार रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीचा प्रस्ताव करावा व ही औषधे मिळविण्याचा तातडीने प्रयत्न करावा.
नगर शहरात ऑक्सिजनचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करावीत. त्यात 10 लिटर प्रती मिनिट क्षमतेची किमान 50 मशिन खरेदीचा प्रस्ताव करावा, अशी सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना केली आहे.
नगर शहर व उपनगरांत रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात लक्षणे जास्त असलेल्या अनेक करोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी झाला आहे.
बहुतेक दवाखान्यांत ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. तेथील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी खरेदी करण्यात येणार्या मशिनचा फायदा होईल, अशी भूमिका महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मांडली आहे.