Devendra Fadnavis : नाशिक कुंभमेळा नियोजनात एआयचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) केली. तसेच हा सिंहस्थ कुंभ ‘डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 2027मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात अनेक सूचना केल्या.
बैठकीमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने डॉ. गेडाम यांनी सादरीकरण केले. गेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार नाशिकमधील एक पथक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याच्या तयारीची माहिती घेण्यास पाठवण्यात आले होते. या पथकाने नोंदवलेल्या सूचना आणि त्याअनुषंगाने सिंहस्थ कुंभमेळ्यात करायच्या सोयी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला. “सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन सुव्यवस्थित व्हावे, सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा. तसेच, कुंभमेळ्याची कामे गतीने व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावे. तसेच कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करावा.
कुंभमेळ्यासाठी लागणारे मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारित घ्यावे,” अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यापूर्वीच प्राथमिक आराखडा तयार केला होता. पण, प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी 4 ते 5 पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. गर्दीचे व्यवस्थापन, घाटांची संख्या, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीचे नियोजनही या आराखड्यात असावे.
नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढवण्यात यावा. तसेच या रस्त्यांच्या बाजूला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा. नाशिक शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करावी. गोदावरी नदीच्या काठावर किनारी रस्ता तयार करता येईल का? याचा ड्रोन सर्व्हेक्षण करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.





