दहशतवादासंदर्भात अमेरिकेचा भारताला पाठिंबा; ब्रिटन आणि नेदरलॅन्डकडूनही हल्ल्याचा निषेध

न्यूयॉर्क – दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला असून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध देखील केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, अमेरिका भारतासोबत आहे आणि सर्व दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करते, असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॅमी ब्रूस यांनी गुरुवारी सांगितले.
पहलगामच्या हल्ल्यात मरण पावलेले आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, या क्रूर हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, अशी मागणीही करत आहोत, असेही ब्रुस म्हणाले.
या हल्ल्यामागे पाकिस्तान असू शकतो का आणि तणाव कमी करण्यासाठी अमेरिका काही प्रयत्न करत आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना हे प्रकरण गंभीर असल्याने त्याची तीव्रता वाढली आहे, असे उत्तर ब्रुस यांनी दिले. मात्र या संदर्भात अधिक वक्तव्य या वेळी केले जाऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती का असे विचारले असता, मी यावर भाष्य करणार नाही… तसे मी आधीच सांगितले होते, असे उत्तर ब्रुस यांनी दिले.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, नेदरलँड्सचे पंतप्रधान डिक शूफ आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा दिसानायके यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला.





