US 126% tariff on solar firms: भारतीय सौर उत्पादनांवर अमेरिकेने लावला 126 टक्के जादा कर; देशातील नागरिकांना फायदा की तोटा होणार जाणून घ्या…
US 126% tariff on solar firms: वारी एनर्जीजसारख्या इतर भारतीय कंपन्यांनी चौकशीत सहभाग घेतला होता, तरीही त्यांनाही सध्या हाच १२६ टक्क्यांचा कर लागू आहे. ही चौकशी अमेरिकन सौर उत्पादकांच्या एका संघटनेने ऑगस्ट २०२४ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली होती.

US 126% tariff on solar firms: अदानी समूहाच्या दोन कंपन्यांनी अमेरिकेच्या चौकशीत सहकार्य नाकारल्यामुळे अमेरिकेने भारतीय सौरऊर्जा उत्पादनांवर तब्बल १२६ टक्के आयात कर लादला आहे. २० फेब्रुवारी रोजी जारी झालेल्या या आदेशामुळे भारतातून अमेरिकेला होणारी सौर उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण?
अमेरिका सरकार तपासत होते की भारतीय सौर कंपन्यांना भारत सरकारकडून अनुचित आर्थिक सवलती मिळत आहेत का, ज्यामुळे त्या अमेरिकन कंपन्यांपेक्षा स्वस्त दरात माल विकू शकतात. या तपासणीत अदानी समूहाच्या मुंद्रा सोलर एनर्जी आणि मुंद्रा सोलर पीव्ही या दोन कंपन्यांना सहभागी होणे बंधनकारक होते. मात्र, या कंपन्यांनी अमेरिकेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वेळेत न देता चौकशीतूनच अंग काढून घेतले. त्यामुळे अमेरिकेने सर्वाधिक कठोर नियम वापरत हा जड कर लादला. अदानी समूहाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत भाष्य करण्यास नकार दिला.
चीनवरील अवलंबित्वही आडवे आले –
अमेरिकेने आणखी एक महत्त्वाचा आक्षेप नोंदवला. भारतातील सौर पॅनेल बनवण्यासाठी लागणारा बहुतांश कच्चा माल चीनमधून येतो आणि तो बाजारभावापेक्षा कमी दरात पुरवला जातो, असा संशय अमेरिकेने व्यक्त केला. जीटीआरआय या संस्थेचे प्रमुख अजय श्रीवास्तव म्हणाले की, “भारताने आपल्या सरकारी योजना बदलल्या तरी चीनी कच्च्या मालावर अवलंबून असलेल्या कंपन्यांना हा कर चुकवता येणार नाही.”
सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होईल?
२०२४ मध्ये भारताने अमेरिकेला सुमारे ५,९०० कोटी रुपयांचे सौर पॅनेल विकले होते, जे २०२२ च्या तुलनेत नऊ पटींनी जास्त आहे. आयसीआरएचे तज्ज्ञ अंकित जैन यांनी सांगितले की, या करामुळे भारताची अमेरिकेतील सौर निर्यात मोठ्या प्रमाणात कमी होईल. निर्यात घटल्यास हा माल भारतातच विकला जाईल, त्यामुळे देशांतर्गत बाजारात सौर पॅनेलचे भाव पडतील आणि उत्पादक कंपन्यांचा नफा कमी होईल.
वारी एनर्जीजसारख्या इतर भारतीय कंपन्यांनी चौकशीत सहभाग घेतला होता, तरीही त्यांनाही सध्या हाच १२६ टक्क्यांचा कर लागू आहे. ही चौकशी अमेरिकन सौर उत्पादकांच्या एका संघटनेने ऑगस्ट २०२४ मध्ये केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली होती.
दरम्यान, आधी भारतीय सौर उत्पादनांवर असा कोणताही विशेष ‘काउंटरव्हेलिंग’ कर नव्हता. २०२२ मध्ये अमेरिकेत भारतातून फक्त ८३.८६ दशलक्ष डॉलरचे सौर उत्पादन आयात होत होते, जे २०२४ पर्यंत ७९२.६ दशलक्ष डॉलरवर पोहोचले म्हणजे नऊ पटींनी वाढ. या झपाट्याने वाढणाऱ्या आयातीमुळेच अमेरिकन उत्पादकांनी तक्रार केली आणि ही चौकशी सुरू झाली. हा १२६ टक्क्यांचा कर त्यापेक्षा वेगळा आणि खास सौर उत्पादनांसाठी आहे. आधी असा कोणताही खास कर नव्हता, हा पहिल्यांदाच लादला गेला आहे.





