WEF CEO Borge Brende: लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या संबंधांची स्वतंत्र चौकशी सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांतच जागतिक आर्थिक मंचाचे (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम – डब्ल्यूईएफ) अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी बोर्ज ब्रेंडे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०१७ पासून डब्ल्यूईएफचे नेतृत्व करणाऱ्या ब्रेंडे यांनी हा निर्णय अमेरिकेच्या न्याय विभागाने (यूएस डीओजे) जाहीर केलेल्या कागदपत्रांनंतर घेतला. या दस्तऐवजांतून उघड झाले की, नॉर्वेचे माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या ब्रेंडे यांनी एपस्टाईनसोबत तीन व्यावसायिक रात्रिभोजन केले होते तसेच ईमेल आणि संदेशांद्वारे त्याच्याशी संपर्कात होते. मात्र राजीनाम्याच्या निवेदनात ब्रेंडे यांनी एपस्टाईनचा कोठेही उल्लेख केला नाही. “सखोल विचारांती मी जागतिक आर्थिक मंचाच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. साडेआठ वर्षांचा हा कालखंड माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक होता. मला वाटते की आता मंचाने कोणत्याही विचलनाशिवाय आपले महत्त्वाचे कार्य पुढे सुरू ठेवण्याची ही योग्य वेळ आहे,” असे ते म्हणाले. हेही वाचा – विनोद तावडे, रामदास आठवले यांची राज्यसभेसाठी भाजपच्या यादीत आघाडी; ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट डब्ल्यूईएफचे सह-अध्यक्ष आंद्रे हॉफमन आणि लॅरी फिंक यांनी स्वतंत्र निवेदनात सांगितले की, बाहेरील विधि सल्लागारांनी केलेल्या स्वतंत्र चौकशीत यापूर्वी उघड झालेल्या माहितीपलीकडे कोणतीही अतिरिक्त चिंताजनक बाब आढळली नाही. दरम्यान, मंचाच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली अलॉइस झ्विंगी हे हंगामी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील, तर कायमस्वरूपी उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होणार आहे. एपस्टाईन प्रकरण: जागतिक नेत्यांवर संशयाची सावली- अमेरिकेच्या न्याय विभागाने एपस्टाईनशी संबंधित ३० लाखांहून अधिक पानांचे दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. फेडरल लैंगिक तस्करीच्या आरोपाखाली खटला सुरू असताना २०१९ मध्ये तुरुंगात एपस्टाईनने आत्महत्या केली होती. या दस्तऐवजांमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी एपस्टाईनचे संबंध चव्हाट्यावर आले आहेत. ब्रिटनमध्ये माजी ड्यूक ऑफ यॉर्क अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांच्यासह इतर प्रमुख व्यक्तींविरोधात फौजदारी चौकशीही सुरू झाली आहे. जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum – WEF) ही १९७१ मध्ये क्लॉस श्वाब यांनी स्थापन केलेली स्वायत्त आंतरराष्ट्रीय संस्था असून तिचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. जागतिक राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यासाठी जगभरातील सरकारे, उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि नागरी समाजाला एकत्र आणणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. दरवर्षी जानेवारीत स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणारी वार्षिक परिषद जगभरात प्रसिद्ध आहे. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, बड्या कंपन्यांचे सीईओ आणि तज्ज्ञ सहभागी होतात. हवामान बदल, गरिबी निर्मूलन, तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार यांसारख्या विषयांवर धोरणात्मक दिशा ठरवण्यात या मंचाची महत्त्वाची भूमिका असते.