US Tariff: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लादलेले ‘reciprocal tariffs’ (परस्पर टॅरिफ) बेकायदेशीर ठरवत रद्द केले आहेत. या ऐतिहासिक निर्णयानंतर भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून, या घडामोडींवर आणि भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय? शुक्रवारी अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ६-३ अशा बहुमताने हा निकाल दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे संसदेच्या मंजुरीशिवाय ‘आयईईपीए १९७४’ (IEEPA 1974) अंतर्गत अशा प्रकारचे टॅरिफ लागू करू शकत नाहीत.” या निर्णयामुळे ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांना मोठा धक्का बसला आहे. वाणिज्य मंत्रालयाची अधिकृत भूमिका – भारतीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची दखल घेतली आहे. तसेच या निकालानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या पुढील पावलांचेही आम्ही निरीक्षण करत आहोत. या सर्व घडामोडींचा भारतीय व्यापारावर काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास सध्या सुरू आहे.” केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे वक्तव्य – या मुद्द्यावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची भारत सरकार कायदेशीर तपासणी करेल. यावर अधिकृत आणि तांत्रिक प्रतिक्रिया वाणिज्य मंत्रालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून दिली जाईल. सरकार या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास करूनच पुढचे पाऊल उचलणार आहे.” ट्रम्प यांची नवी खेळी: १० टक्के आयात शुल्क लागू – न्यायालयाने टॅरिफ रद्द केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तातडीने एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. याद्वारे जुने टॅरिफ रद्द करून त्यांनी ‘तात्पुरते आयात अधिभार’ (Temporary Import Surcharge) लागू करण्याची घोषणा केली आहे. आता नवीन नियमानुसार १० टक्के तात्पुरते आयात शुल्क २४ फेब्रुवारी रोजी रात्री १२:०१ वाजेपासून लागू होणार आहे. दरम्यान, भारत आता या १० टक्के नवीन आयात शुल्काचा भारतीय निर्यातदारांवर किती परिणाम होईल, याचे विश्लेषण करत आहे. अमेरिकेच्या या नव्या व्यापार युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत पुन्हा एकदा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा: भाजप आमदाराला 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; दोन स्वीय सहाय्यकही जाळ्यात