Israel-Iran war : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, ‘इराणवर आता लगेचच हल्ला होणार नाही’

Israel-Iran war । Joe Biden – इराणवरील इस्रायलच्या हल्ल्यांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की त्यांचे प्रशासन इराणी तेल सुविधांवर संभाव्य इस्रायली हल्ल्यांबद्दल चर्चा करत आहे. इस्त्रायलकडून इतक्यातच इराणवर कोणता हल्ला केला जाईल अशी आम्हाला अपेक्षा नाही.
तुम्ही इराणच्या तेल प्रकल्पांवर इस्त्रायलने हल्ला करावा या बाजूने आहोत का, या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, आम्ही त्यावर चर्चा करत आहोत. दरम्यान, त्यांच्या या टिप्पणीनंतरच गुरुवारी तेलाच्या किमती पाच टक्क्यांनी वाढल्या व जगभरातील शेअर बाजारांना त्याचा तडाखाही बसला.
दरम्यान, तेलाच्या किमतीतील वाढ ही बायडेन आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते कारण तेलाच्या किमती हा 5 नोव्हेंबरच्या निवडणुकीत प्रमुख मुद्दा आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात आता हाच मुद्दा लावून धरला आहे.
दरम्यान, इस्त्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांना लक्ष्य केले तर त्याला आमचा पाठिंबा नसेल आणि ही बाब आम्हाला अमान्य असेल असे बायडेन यांनी कालच स्पष्ट केले आहे.





