US-Pakistan: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी (२९ जानेवारी) पाकिस्तानबाबत एक मोठी घोषणा करत आपल्या नागरिकांना पाकिस्तानात प्रवास करण्यापूर्वी पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. दहशतवाद, अपहरण आणि वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला ‘लेवल ३’ (Level 3) श्रेणीतील ट्रॅव्हल ॲडव्हायझरीमध्ये ठेवले आहे. काय आहे ‘लेवल ३’ श्रेणी? अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने (State Department) जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पाकिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कमकुवत असून तिथे कोणत्याही इशाऱ्याशिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकतात. ‘लेवल ३’ ही अत्यंत जोखमीची श्रेणी मानली जाते. हॉटेल, मार्केट, शॉपिंग मॉल्स, सरकारी इमारती, शाळा, रुग्णालये आणि लष्करी ठिकाणे ही दहशतवाद्यांची मुख्य लक्ष्ये असू शकतात, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. काही भागांसाठी ‘लेवल ४’ चा रेड अलर्ट- पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या माहितीनुसार, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान यांसारख्या अशांत प्रांतांसाठी अमेरिकेने ‘लेवल ४’ चा इशारा दिला आहे. याचा अर्थ अमेरिकन नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत या भागात जाऊ नये. या भागात हत्या आणि अपहरणाच्या घटना सर्रास घडत असून, विशेषतः सरकारी अधिकारी आणि परदेशी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडिया पोस्टवरही कडक निर्बंध- अमेरिकेने आपल्या नागरिकांना पाकिस्तानातील स्थानिक कायद्यांबाबतही सावध केले आहे. परवानगीशिवाय निदर्शने किंवा आंदोलनात सहभागी झाल्यास अटकेची कारवाई होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोशल मीडियावर पाकिस्तान सरकार, लष्कर किंवा अधिकाऱ्यांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यास अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेतले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. व्हिसा बंदीनंतरचा दुसरा प्रहार – शहबाज शरीफ सरकार आणि जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी प्रशासनासाठी हा महिनाभराटातील दुसरा मोठा धक्का आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानसह ७५ देशांतील नागरिकांसाठी इमिग्रंट व्हिसा (Immigrant Visa) प्रक्रिया स्थगित केली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बंदी तात्पुरती असेल अशी आशा व्यक्त केली असली, तरी ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी होताना दिसत आहे.