US Open 2024 : गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान संपुष्टात…

US Open 2024 : – गतविजेती कोको गॉफ यूएस ओपनमधून बाहेर पडली आहे. 20 वर्षीय अमेरिकन स्टार गॉफला तिच्याच देशाच्या एम्मा नवारोने 6-3, 4-6, 6-3 ने पराभूत केले. नवारोने गॉफचा 2 तास 12 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव केला.
दिवसाच्या इतर सामन्यांमध्ये जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ आणि फ्रान्सिस टियाफो यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात आर्यना सबालेन्का हिनेही टॉप-8 मध्ये स्थान मिळविले.
स्पर्धेच्या चालू हंगामात गतविजेता नोवाक जोकोविच आणि स्पेनचा युवा स्टार कार्लोस अल्काराझ हेही अपसेटचे बळी ठरले आहेत. सर्बियन स्टार जोकोविचचा ऑस्ट्रेलियाच्या 28व्या मानांकित अँलेक्सी पोपिरिनने 6-4, 6-4, 2-6, 6-4 असा पराभव केला. तर अल्काराझला 74व्या मानांकित खेळाडूने दुसऱ्या फेरीतून बाहेर काढले.
तिसऱ्या मानांकित गॉफने सामन्यादरम्यान 19 दुहेरी दोष (सर्विस दरम्यान चेंडू नेटवर आदळणे) केला. याचे परिणाम तिला शेवटी भोगावे लागले. पहिला सेट 3-6 ने गमावल्यानंतर, गॉफने पुनरागमन केले आणि दुसरा सेट 6-4 असा जिंकला. पण नवारोने तिसरा सेट जिंकून सामना जिंकला. आता नवारोसमोर उपांत्यपूर्व फेरीत पाउला बडोसाचे आव्हान असेल.
Paris Paralympics 2024 : भारताच्या नितेश कुमारचा ‘गोल्डन स्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावलं सुवर्णपदक…
पराभवानंतर गॉफ म्हणाली, ‘काही निकाल अनुकूल नसले तरी मी मोसमात चांगली कामगिरी केली.’ गेल्या काही स्पर्धांमध्ये गॉफची कामगिरी चांगली नव्हती. पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या फेरीत तिला पराभव पत्करावा लागला होता, तर यूएस ओपनच्या तयारीसाठी खेळल्या गेलेल्या स्पर्धेतही तिला चांगली कामगिरी करता आली नाही.
फ्रिट्झने रुडचा पराभव केला
पुरुष एकेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने उपउपांत्यपूर्व लढतीत 2022च्या अंतिम फेरीतील कॅस्पर रुडचा 3-6, 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला. टॉप-8 मध्ये त्याचा सामना अलेक्झांडर झ्वेरेव्हशी होईल. झ्वेरेवने अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमाचा 3-6, 6-1, 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचवेळी फ्रान्सिस टियाफोने अँलेक्सी पोपिरिनवर 6-4, 7-6(3), 2-6, 6-3 असा विजय मिळवला. त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ग्रिगोर दिमित्रोव्हशी होईल.





