US Open 2024 (Women’s) : बेलारूसच्या अरिना सबालेन्काला विजेतेपद, पटकावले तिसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद…

US Open 2024 Final (Aryna Sabalenka vs Jessica Pegula) : – जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या आरिना सबलेन्काने अमेरिकेच्या जेसिका पेगूलाला सरळ सेटमध्ये पराभूत करताना यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजतेपद पटकावले. गत वर्षी युएस ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत आरिना सबलेन्काला अमेरिकेच्या कोको ग्राफने पराभूत केले होते. मात्र, यावेळी सबलेन्काने विजय साकारून इतिहास रचला.
तिचे हे तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी तिने 2023 आणि 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. याशिवाय तिने 2021 आणि 2023 मध्ये विम्बल्डन आणि 2023 मध्ये फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. तिची सध्याची क्रमवारी दुसऱ्या क्रमांकाची आहे.
महिला एकेरीच्या अंतिम लढतीत आरिना सबलेन्काने 1 तास 53 मिनिटात जेसिका पेगूलाचे आव्हान 7-5, 7-5 असे मोडून काढले. चांगल्या सर्व्हिस नंतर पेगूलाने 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र सबलेन्काने सर्व्हिस ब्रेक करून पुनरागमन केले. 5-4 अशी सबलेन्का आघाडीवर असताना पेगूलाने तिची सर्व्हिस ब्रेक करून 5-5 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोन पॉईंट्स गमावणाऱ्या सबलेन्काने तिसरा पॉईंट मिळवून पहिला सेट 7-5 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये सबलेन्काने 3-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मात्र पेगूलाने सबलेन्काची सर्व्हिस ब्रेक करून बरोबरी साधली. त्यानंतर पेंगूलाने अजून दोन गुण मिळविताना 5-3 अशी आघाडी मिळविली. यानंतर मात्र सबलेन्काने आपला खेळ उंचावला व दुसरा सेट देखील 7-5 असा जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.
Aryna Sabalenka holds the US Open trophy high.
The most dominant woman in the Grand Slams this year.
The best hard court player in the world.
Blood, sweat, & tears went into this.
Finally, this moment is HERS. 🥹🐅
pic.twitter.com/VS1uHJsoJz— The Tennis Letter (@TheTennisLetter) September 7, 2024
पुरुष गटात फ्रिट्झ – सिनर आज आमनेसामने
पुरुष गटाच्या अंतिम लढतीत इटलीच्या जॅनिक सिनरसमोर अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचे आव्हान असणार आहे. हा सामना आज रात्री 11.30 वाजता सुरू होईल. फ्रिट्झने उपांत्य फेरीत त्याचाच देशबांधव फ्रान्सिस टियाफोचा 4-6, 7-5, 4-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. तर सिनरने ड्रेपरला 7-5, 7-6, 6-2 असे पराभूत करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फ्रिट्झ हा 18 वर्षात यूएस ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी अँडी रॉडिकने 2006 मध्ये ही कामगिरी केली होती.
US Open 2024 (Men’s) : यंदा मिळणार नवा विजेता, सिनर आणि फ्रिट्झ विजेतेपदासाठी भिडणार…
अनेक दिग्गज खेळाडू पराभूत
यूएस स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला स्पेनचा कार्लोस अल्काराज, 24 ग्रँड स्लॅम विजेता असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, महिला गटातून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली पोलंडची इगा स्विटेक हे दिग्गज खेळाडू पराभूत झाले आहेत.





