US Open 2024 : अल्काराझ, सिनर, नाओमी, इगा स्विटेक दुसऱ्या फेरीत दाखल…

US Open 2024 : कार्लोस अल्काराझ, जॅनिक सिनर, नाओमी ओसाका, इगा स्विटेक, जेसिका पेगुला या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करताना यूएस ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. उद्यापासून (गुरवार) स्पर्धेतील दुसऱ्या फेरीची सुरुवात होणार असून यात फेरीत अनेक उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अनेक मानांकित खेळाडू आमनेसामने येणार असल्याने या लढती नक्कीच प्रेक्षणीय होण्याची शक्यता आहे.
कार्लोस अल्काराझचा विजय
स्पेनच्या तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियाच्या ली तू वर ६-२, ४-६, ६-३, ६-१ असा विजय मिळविताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या लीने चांगली लढत दिली. पहिल्या सेट अल्काराझने जिंकल्यानंतर लीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले होते. मात्र त्यानंतर अल्काराझने पुन्हा एकदा आपला दर्जा सिद्ध करताना पुढील दोन्ही सेटमध्ये वर्चस्व राखताना विजय साकारला. तिसऱ्या मानांकित कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धाचे विजेतेपद पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कार्लोस अल्काराझला सर्बियाच्या नोव्होक जोकोविचकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुसऱ्या फेरीत अल्काराझ समोर नेदर्लंड्सच्या बोटिक व्हॅन डी झांडस्चुल्पचे आव्हान असणार आहे.
जॅनिक सिनरकडून मॅकडोनाल्ड पराभूत
अग्रमानांकित इटलीच्या जॅनिक सिनरने अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्डला २-६, ६-२, ६-१, ६-२ असे पराभूत करताना दुसऱ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये मॅकेन्झी मॅकडोनाल्डने शानदार खेळ करताना पहिला सेट २-६ असा आरामात जिंकला. यानंतर मात्र जॅनिक सिनरने सलग तीन सेट जिंकून आपला दर्जा दाखवून दिला. जॅनिक सिनरला दुसऱ्या फेरीत अलेक्स मिशेलसेनचा सामना करावा लागणार आहे. जॅनिक सिनरला नुकतेच उत्तेजकद्रव्य चाचणीच्या आरोपातून दोषमुक्त करण्यात आले होते. यावर अनेक खेळाडूंनी आक्षेप घेतला होता.
Asian Champions Trophy 2024 : भारतीय हॉकी संघाची घोषणा, ‘हे’ 18 खेळाडू चीनमध्ये दाखवतील आपली ताकद…
चार वर्षांनी नाओमीचा दमदार विजय
एकावर्षापूर्वी प्रसूती रजेवर असणाऱ्या व पुन्हा टेनिस कधी खेळेल याची खात्री नसलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने दहाव्या मानांकित लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेन्कोला ६-३, ६-२ असे पराभूत करताना स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दोन्ही सेट्समध्ये नाओमीने धामाकेदार खेळ केला. सामन्यात नाओमीने ९ बिनतोड सर्व्हिस केल्या. नाओमीने तीनही ब्रेक पॉईंट्स सह हा विजय साकारला. दुसऱ्या फेरीत झेकिया कॅरोलिना मुचोवाचे आव्हान नाओमी समोर असणार आहे.
इगा स्विटेक टायब्रेकरमध्ये विजयी…
पोलंडच्या इगा स्विटेकने टायब्रेकरमध्ये कामिला राखीमोवाला पराभूत केले. तिने ही लढत ६-४, ७-६(८) अशी जिंकली. इगाने चांगला खेळ करताना ६-४ असा पहिला सेट जिंकला. त्यानंतर मात्र कामिलाने स्विटेकला टायब्रेकरमध्ये पकडले. मात्र अग्रमानांकित असणाऱ्या इगाने आपला खेळ उंचावताना गुणांची कमाई करताना विजय साकारला. कामिलाने तब्बल पाच वेळा डबल फॉलट केले. दुसऱ्या फेरीत जपानच्या २१७ व्या मानांकित एना शिबहाराचे आव्हान स्विटेकसमोर असणार आहे.
पेंगूलाकडून शेल्बी रॉजर्स पराभूत
जागतिक क्रमवारीत सहाव्या मानांकित असणाऱ्या जेसिका पेंगूलाने आपल्या नावाला साजेसा खेळ करताना अमेरिकेच्याच शेल्बी रॉजर्सला सरळ सेटमध्ये ६-४, ६-३ असे पराभूत करून दुसरी फेरी गाठली. दोन्ही सेट्समध्ये जेसिकाने वर्चस्व राखताना शेल्बी रॉजर्सवर एकतर्फी मात केली. दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या सोफिया केनिनचे आव्हान असणार आहे. सोफियाने पहिल्या फेरीत २०२१ च्या विजेती एम्मा रडुकानूला पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता.





