US Open 2024 (Jannik Sinner vs Taylor Fritz) : जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला खेळाडू यानिक सिनर आणि अमेरिकेच्या 12व्या मानांकित टेलर फ्रिट्झ यांनी संघर्षपूर्ण लढती जिंकून प्रथमच यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तीन आठवड्यांपूर्वी डोपिंग प्रकरणात निर्दोष सुटलेल्या इटलीच्या 23 वर्षीय सिनरने ब्रिटनच्या 25व्या मानांकित जॅक ड्रेपरवर 7-5, 7-6 (3), 6-2 असा विजय नोंदवला तर दुसरीकडे फ्रिट्झने देशबांधव अमेरिकन खेळाडू आणि 20व्या मानांकित फ्रान्सिस टियाफोचा 4-6, 7-5, 4-6, 6-4, 6-1 अशा चुरशीच्या लढतीत पराभव केला आणि प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
साल 2006 नंतर पहिल्यांदाच अमेरिकन खेळाडू यूएस ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. फ्रिट्झपूर्वी, अँडी रॉडिक हा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा शेवटचा अमेरिकन खेळाडू होता. त्यानंतर अंतिम फेरीत त्याला रॉजर फेडररकडून पराभव पत्करावा लागला होता. पुरुष एकेरीत यूएस ओपन जिंकणारा रॉडिक हाच शेवटचा अमेरिकन खेळाडू होता. 2003 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
दुसरीकडे महिलांमध्ये अमेरिकेच्या जेसिका पेंगूलाने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाला तर दुसऱ्या मानांकित बेलारूसच्या आरिना साबलेन्काने अमेरिकेच्या एम्मा नवारोचा पराभव करताना यूएस ओपन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामान्यात धडाक्यात प्रवेश केला आहे. महिलांचा विजेतेपदाचा सामना हा भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी मध्यरात्री 1.30 वाजता तर पुरूषांचा सामना रविवारी रात्री 11.30 वाजता खेळवला होईल.