वॉशिंग्टन – अमेरिकेच्या यूएसएस निमित्झ या विमानवाहू नौकेवरील एक विमान आणि एक हेलिकॉप्टर दक्षिण चीन समुद्रामध्ये आज दुर्घटनाग्रस्त झाले. अवघ्या ३० मिनिटांच्या अवधीमध्ये दोन दुर्घटना घडल्या असल्याचे नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटच्यावतीने सांगण्यात आले. रविवारी दुपारी एम-६०आर सी हॉक हे हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले. या हेलिकॉप्टरमधील ३ कर्मचाऱ्यांना सुखरुप वाचवण्यात आले. तर एफआयए-१८एफ या सुपर हॉर्नेट लढाऊ विमानालाही असाच अपघात झाला. या विमानातील दोन वैमानिक सुखरुप विमानातून बाहेर पडले होते. त्यांनाही सुखरुप वाचवण्यात आले. वाचवलेले पाचही कर्मचारी सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे नौदलाच्यावतीने सांगण्यात आले. दोन्ही अपघातांच्या कारणांचा तपास सुरू आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या घटना खराब इंधनामुळे घडल्या असण्याची शक्यता आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या घटनांमागे घातपाताची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आणि लपवण्यासारखे काहीही नसल्याचे सांगितले. यूएसएस निमित्झ वॉशिंग्टन मधील किट्सॅप या नौदल तळावरील त्याच्या होम पोर्टवर परतत असताना या दुर्घटना घडल्या. येमेनमधील हौथींकडून व्यापारी जहाजांवर हल्ले होऊ लागल्यामुळे अमेरिकेच्या नौदलाचे हे विमानवाहू जहाज मध्यपूर्वेमध्ये तैनात केले गेले होते. यूएसएस हॅरी एस. ट्रुमन या अमेरिकेच्या नौदलाच्या आणखी एक विमानवाहू जहाजाला अलिकडच्या काळातल्या काही महिन्यांत मध्य पूर्वेत तैनात असताना अनेक अपघात झाले होते.