F-35 Crash : अमेरिकन एअर फोर्सला मोठा झटका ! जगातील सर्वात शक्तीशाली फायटर विमान F-35 कोसळलं

अलास्कामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सिंगल-सीटर F-35 फायटर जेट दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानाने सर्वात आधी आपले नियंत्रण गमावले आणि नंतर ते कोसळले. खाली कोसळताच विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. सुदैवाने वैमानिक वेळीच विमानातून बाहेर पडल्याने त्याचे प्राण बचावले. एइलसन एअर फोर्स बेसच्या रनवेवर ही दुर्घटना घडली.
“स्थानिक वेळेनुसार दुपारी 12.49 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. F-35 लँडिंगच्या तयारीमध्ये असताना हा अपघात झाला” अशी माहिती एइलसन एअर बेसचे प्रवक्ते सार्जेंट किम्बर्ली टॉचेट यांनी दिली. “पायलटने सुरक्षित बाहेर निघण्याआधी खराबीमुळे विमानातील इनफ्लाइट इमरजेंसी ऑन केलेली” इमर्जन्सी पथकाने पायलटला चेकअपसाठी बॅसेट आर्मी रुग्णालयात दाखल केले आहे.
या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान आकाशातून जोरात फिरुन खाली कोसळताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे विमान कोसळल्यानंतर स्फोट होऊन विमानात आग लागली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या सुरु आहे.
काय आहे विमानाची खासियत?
F-35 हे जगातील सर्वात शक्तीशाली, महागड फायटर विमान आहे. अमेरिकेने काही देशांना हे विमान विकलय. F-35 हे पाचव्या पिढीच फायटर जेट आहे. रडारलाही हे विमान पकडता येत नाही. अत्यंत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी हे फायटर जेट सुसज्ज आहे. F-35 चा अपघात हा अमेरिकन एअर फोर्ससाठी मोठा झटका मानला जात आहे.





