US-Iran attack : अमेरिका-इराणने एकमेकांवरचे हल्ले थांबवले !
अमेरिका आणि इराणने एकमेकांवरील हल्ले थांबवले असून या आठवड्यात कतार येथे होणाऱ्या चर्चेच्या पुढील टप्प्यासाठी आपले शिष्टमंडळ पाठवले जाईल, असे म्हटले आहे.

US-Iran attack – अमेरिका आणि इराणने एकमेकांवरील हल्ले थांबवले असून या आठवड्यात कतार येथे होणाऱ्या चर्चेच्या पुढील टप्प्यासाठी आपले शिष्टमंडळ पाठवले जाईल, असे म्हटले आहे. मात्र पर्शियन आखातातल्या हल्ल्यांनंतर युद्ध संपवण्यासाठीच्या वाटाघाटींसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर भेटीला आपली तयारी नसल्याचे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे अमेरिकेबरोबर चर्चेसाठी इराणनेच विनंती केल्यामुळे मंगळवारी दोहा येथे चर्चा होणार असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
मात्र अशाप्रकारे चर्चेचे नियोजन ठरल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी नाकारले होते. पण हंगामी कराराच्या अटींबाबत चर्चा करण्यासाठी कतार येथे शिष्टमंडळ पाठवले जाणार आहे. मात्र या चर्चेमध्ये अमेरिकेचा सहभाग असलणार नाही, असे इराणच्या एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले.
होर्मूझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून अलिकडे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. चार दिवस एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले केल्यानंतर दोन्ही बाजूंनी सोमवारी हल्ले स्थगित केले आहेत. काही तांत्रिक मुद्द्यांवर सहमती करण्यासाठी ६० दिवस वाटाघाटी अपेक्षित आहेत.
यावेळी इराणकडील समृद्ध युरेनियमची विल्हेवाट लावणे, अमेरिकेकडून लावण्यात आलेले निर्बंध उठवणे, होर्मूझमधील वाहतुकीसाठी शुल्क आकारले जाऊ नये आदी मुद्द्यांबाबत निर्णय घेतले जाणे अपेक्षित आहे.
चर्चेच्या पुढील फेरीबाबत गैरसमजूत (US-Iran attack)
अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी कतारला भेटणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केल्यानंतर व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी या चर्चेसाठी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर जाणार असल्याचे म्हटले होते. प्रमुख मध्यस्थ असलेल्यापाकिस्ताननेही मंगळवारी कतारमध्ये चर्चा होणार असल्याचे म्हटले होते.
मात्र अशा कोणत्याही चर्चेचे नियोजन नसल्याचे इराणचे एक प्रतिनिधी घारिबाब्दी यांनी म्हटले होते. तर कतारने गोठवलेला निधी परत मिळवणे आणि करारासंबंधी अन्य मुद्द्यांवरील चर्चेसाठी इराणचे शिष्टमंडळ कतारला जाणार असल्याचे इराणच्या संसदेचे सभापती ईस्माइल बाघेई यांनी सांगितले होते. अमेरिकेबरोबर थेट चर्चा होणार नसली, तरी संदेशांची देवाण-घेवाण होईल, असे त्यांनी सूचित केले.
होर्मूझमधील वाहतुकीबाबत साशंकता (US-Iran attack)
अलिकडच्या काळात इराणने होर्मूझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर दोनदा हल्ले केले आणि आणखी हल्ल्यांचे इशारेही दिले. ओमानच्या किनाऱ्याजवळून पर्यायी मार्गाने जाणाऱ्या जहाजांनाही इराणचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरिन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या तळांनाही लक्ष्य केले.
होर्मूझमधून आंतरराष्ट्रीय जहाजांना बिनदिक्कत प्रवास करता येऊ शकेल, असा दावा जरी ट्रम्प यांच्याकडून सातत्याने केला जात असला, तरी इराणकडून सुरक्षेची हमी दिली न गेल्यामुळे या महत्वाच्या सागरी मार्गावरील वाहतुकीबाबत साशंकता कायम आहे. जोपर्यंत अमेरिका-इराणमधील चर्चेतून अशी हमी मिळत नाही, तोपर्यंत ही वाहतूक धोक्याची असणार, असे बोलले जाते आहे.
पाणसुरुंगांबाबत इराण-फ्रान्समध्ये तणाव (US-Iran attack)
इराणने होर्मूझच्या सामुद्रधुनीमध्ये लावलेले पाणसुरुंग काढण्यासाठी फ्रान्स इतर देशांच्या समन्वयाने प्रयत्न सुरू करणार आहे, असे फअरान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी अलिकडेच म्हटले होते. फ्रान्सची ही कृती चिथावणीखोर असेल, असे सांगून इराणने फ्रान्सलाही इशारा दिला आहे.
हंगामी युद्धविराम करारांतर्गत पाणसुरुंग हटवण्याची जबाबदारी पुर्णपणे इराणचीच आहे आणि अन्य कोणत्याही देशाची नाही, असे इराणचे परराष्ट्र उपमंत्री खाझेम घारिबाब्दी यांनी म्हटले आहे. फ्रान्सच्या दौऱ्यावर गेलेले ओमानचे सुलतान हैथाम बिन तारिक यांच्याबरोबरच्या उच्चस्तरिय बैठकीदरम्यान मॅक्रॉ यांनी पाणसुरुंगांबाबत वक्तव्य केले होते.
लेबनॉनकडून सैन्य तैनातीची तयारी
इस्रायलबरोबरच्या कराराचा भाग म्हणून संपूर्ण दक्षिण लेबनॉन सीमेवर लेबनॉनचे सैन्य तैनात केले जाईल, असे लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांनी म्हटले आहे. लेबनॉन आणि इस्रायलमध्ये शुक्रवारी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अमेरिकेच्या लष्कराचे मध्यपूर्वेसाठीचे कमांडर ऍडमिरल ब्राड कूपर यांच्या बरोबरच्या बैठकीदरम्यान औन यांनी ही ग्वाही दिली.
इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्यापुर्वीच हिज्बुल्लाहचा पुर्ण बंदोबस्त करण्यात यावा. इस्रायलने काही पायलट झोनमधून माघार घ्यावी. तेथेच लेबनॉनचे सैन्य तैनात केले जावे, असे या करारात ठरले आहे. मात्र या कराराचा तपशील उघड करण्यात आलेला नाही. मात्र या कराराची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाल्यास लेबनॉनमध्ये यादवी युद्ध भडकेल, असा इशारा हिज्बुल्लाहने दिला आहे.





