अमेरिकेकडून इराकमध्येही हवाई हल्ले; इराणचे समर्थन असलेल्या कातिब हिज्बुल्लाह गटावर मारा

बगदाद – अमेरिकेने आज इराणचे समर्थन असलेल्या दहशतवादी गटांच्या इराकमधील ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. या दहशतवादी गटांकडून वारंवार अमेरिकेच्या सैन्यावर हल्ले झाल्यानंतर अमेरिकेने हे हवाई हल्ले केले आहेत, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये इराकमधील कातिब हिज्बुल्लाह या इराणचे समर्थन असलेल्या गटाच्या ३ ठिकाणांवर मारा केला गेला. याशिवाय इराणचे समर्थन असलेल्या अन्य दहशतवादी गटांच्या ठिकाणांवर देखील मारा केला गेला. इराक आणि सीरियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या सैन्य दलांवर इराणने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केले गेले होते, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
अमेरिकेच्या सैन्याने मंगळवारी कातिब हिज्बुल्लाहचे मुख्यालय, गोदामे आणि प्रशिक्षण केंद्रांवरही मारा केला होता. याशिवाय रातिब हिज्बुल्लाहची रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरण्याच्या ठिकाणांवरही मारा केला होता, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
पश्चिम इराकमधील सीरियाच्या सीमेजवळील अल काइम आणि राजधानी बगदादच्या दक्षिणेकडील जुर्फ अल- सखर या भागांमध्येही अमेरिकेने हवाई हल्ले केले. इसिसशी संबंधित दहशतवादी गटांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे संरक्षण मंत्री ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे सैन्य आणि आमच्या हिताच्या रक्षणासाठी अशी कारवाई करायला मी आणि अमेरिकेचे अध्यक्ष मागेपुढे बघणार नाही, असेही ऑस्टिन यांनी म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी इराकमधील अल असा हवा तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. त्यात अमेरिकेचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते. हा हल्ला कातिब हिज्बुल्लाह या दहशतवादी गटाने केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली होती.





